
मूल होत नसल्याने सहकारी महिलेचे मूल चोरून नेणाऱ्या महिलेला कुर्ला रेल्वे पोलिसांनी गजाआड केले. रेहाना शेख असे तिचे नाव आहे.
शबनम तायडे ही कॅटरिंगचे काम करते. त्याच कॅटरिंगमध्ये रेहाना हीदेखील काम करते. शनिवारी शबनम ही मुलाला घेऊन कॅटरिंग कामासाठी कुर्ला येथे आली होती. रात्री ती कुर्ला रेल्वे स्थानकात आली. तिची शेवटची लोकल चुकल्याने पहिली लोकल पकडून ती टिटवाळा येथे जाणार होती. तिला झोप लागल्यावर मुलगा हा खेळता खेळता कुर्ला फलाट 1 च्या बाहेर आला. रेहानाने त्या मुलाला घेऊन आरे कॉलनी गाठली. पहाटे शबनमला जाग आली, तेव्हा तिचा मुलगा जागेवर नव्हता. तिने कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना रेहाना दिसली. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे नेला. ती आरे कॉलनी येथे राहत असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. तेथून पोलिसांनी रेहानाला ताब्यात घेऊन त्या मुलाची सुटका केली.
























































