
मुंबईच्या महिला क्रिकेट संघाने बुधवारी महिलांच्या सीनियर वन डे स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केली. मुंबईची कर्णधार सायली सातघरे हिने अवघ्या 5 धावा देत 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नागालॅण्डच्या सहा खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावा काढता आल्या नाहीत. नागालॅण्डचा डाव 17.4 षटकांत 17 धावांमध्येच गडगडला. 18 धावांचा पाठलाग करणाऱया मुंबईने अवघ्या चार चेंडूंत विजयी लक्ष्य ओलांडले.
सहज पाठलाग
मुंबईने 18 धावांचा पाठलाग अगदी सहज केला. सलामीवीर ईशा ओझाने नाबाद 13 धावांची आणि वृशाली भगतने नाबाद 6 धावांची खेळी साकारत मुंबईच्या दिमाखदार विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या चार चेंडूंतच मुंबईने विजय साकारला.
सायलीचा भेदक मारा
मुंबईची मध्यमगती गोलंदाज सायली सातघरे हिच्या भेदक माऱयासमोर नागालॅण्डच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. तिने 8.4 षटके गोलंदाजी करताना चार षटके निर्धाव टाकली आणि 5 धावा देत 7 फलंदाजांना तंबूत पाठवले. एम. दक्षिणीनी दोन व एस. ठाकोरने एक फलंदाज बाद केला.



























































