बेस्टच्या संपात रविवारचा मेगाब्लॉक

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

बेस्ट संप मिटण्यासाठी आणि मिटवण्यासाठी फक्त चर्चा आणि बैठकाच सुरू आहेत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक आज झाली, पण ती निष्फळच ठरली. आता रविवारी सुट्टी, त्यामुळे रविवारचा हा मेगाब्लॉक झाल्यानंतरच संपावर तोडगा सोमवारीच निघेल असे चित्र आहे. बेस्ट संपाचा आज पाचवा दिवस होता.

बेस्टचा संप मिटण्याचे नाव घेत नसल्यामुळे उच्च न्यायालयात याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने याप्रश्नी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर आणि परिवहन विभागाचे सचिव आशीषकुमार सिंग यांच्या हायपॉवर कमिटीची बैठक आज पार पडली. यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्या उपस्थितीत कृती समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. आजच्या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल म्हणून कामगारांसह मुंबईकरांचेच लक्ष लागले होते, मात्र बैठक पार पडल्यानंतर शशांक राव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संप मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. हायपॉवर कमिटीने बेस्ट प्रशासन आणि कृती समितीचे म्हणणे आज ऐकून घेतले असून याबाबतचा अहवाल कमिटी आता मुख्यमंत्र्यांना देणार असून न्यायालयात सोमवारी हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत तरी तोडगा निघण्याची शक्यता नाही.

बसस्टॉप ओस पडले
संपाच्या आजच्या पाचव्या दिवशी एकही बस रस्त्यावरून धावली नाही. ड्रायव्हर आणि कंडक्टरची उपस्थिती नगण्य होती. बेस्टच्या 27 बस आगारांमध्ये बसगाडय़ा जागेवरच उभ्या होत्या तर एरवी गर्दीने आणि प्रवाशांच्या रांगांनी गजबजलेले बसस्टॉप ओस पडले होते. स्थानकांपासून लांब राहणाऱया मुंबईकरांचे या संपामुळे अक्षरशः हाल झाले आहेत. वांद्रे, बीकेसी, अंधेरी, वर्सोवा, गोरेगाव दिंडोशी, बोरिवली मागाठाणे, गोराई अशा लांबच्या ठिकाणी बसने जाणाऱया प्रवाशांचे या संपामुळे पार कंबरडे मोडले आहे.

विद्युत विभागाचे कर्मचारी संपात सहभागी नाहीत
विद्युत विभागात शिवसेनाप्रणीत मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन ही मान्यताप्राप्त युनियन असून ती या संपात सहभागी नाही, असे या युनियनचे विठ्ठलराव गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. संजय घाडीगावकर यांच्या इलेक्ट्रिकल युनियनने कामगारांची दिशाभूल करण्यासाठी संपाची चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. घाडीगावकर यांच्या युनियनचे अतिशय कमी सदस्य असून त्यांनी शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हा बनाव केल्याचाही आरोप गायकवाड यांनी केला आहे.

संपाची किंमत मुंबईकरांच्या खिशातून
संपामुळे मुंबईकरांना भुर्दंड सोसावा लागू शकतो. कामगारांच्या मागण्या मान्य केल्यास बेस्टवर 540 कोटींचा भार बेस्टला सोसावा लागू शकतो. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने बेस्टच्या भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. कमीत कमी 4 रुपये तर जास्तीत जास्त 23 रुपयांपर्यंत ही भाडेवाढ होऊ शकते.

best-box

ओला-उबेरचाही संपाचा इशारा
बेस्ट कर्मचाऱयांच्या संपामुळे मुंबईकर मेटाकुटीस आलेले आले असतानाच आता ओला-उबेर चालकांनीही संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकर पुरते बेहाल होणार आहेत. ओला-उबेर या कंपन्याकडून चालकांना जाणीवपूर्वक बेशिस्तीचे कारण देत ब्लॅक लिस्ट करून त्या जागी कंपनी आपल्या स्वतःच्या गाडय़ा सुरू करत आहे. त्यामुळे चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहणार असल्याने ओला-उबेर चालक-मालक संघटनेने कंपन्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात येत्या आठवडय़ात संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिला आहे.