
सामना प्रतिनिधी, मुरबाड
ठाणे जिह्यातील लाखो नागरिकांना पाणी पुरवणाऱ्या बारवी धरणाची उंची वाढवण्यासाठी मुरबाडमधील 11 गावे व पाडय़ांची जमीन 22 वर्षांपूर्वी घेण्यात आली, पण आदिवासींच्या दुर्दशेचे फेरे अजून संपलेले नाहीत. कोळेवाडीतील 20 घरे कोसळल्याने यंदाची ग्रामस्थांची दिवाळी अंधारात असून 12 घरे कोणत्याहीक्षणी पडतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोळेवाडीतील रहिवाशांच्या नशिबी अशुद्ध पाणी असून अनेक मूलभूत सुविधांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. लवकरात लवकर आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी आदिवासी धरणग्रस्तांनी केली आहे.
बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्यासाठी मुरबाडमधील 11 गावांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. त्यापैकी एक असलेल्या कोळेवाडीची सध्या अतिशय वाईट अवस्था आहे. येथे 180 घरे असून साडेतीनशे जणांची लोकवस्ती आहे.
कोणत्याही परिस्थितीत गाव सोडणार नाही…
लवकरात लवकर आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आली असून आम्ही गाव सोडून जाणार नाही, असे सुरेखा कडाळी, मंदा कडाळी या ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान मूलभूत सुविधा मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभू पाटील यांनी दिला आहे.
summary- murbad kolewadi villagers demand rehabilitation






























































