
सामना प्रतिनिधी । बोरी
परभणीतल्या जिंतूर तालुक्यातील सोन्ना येथे शिवीगाळ केल्याच्या रागातून एकाचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. बाळासाहेब गिराम (45) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळासाहेब आणि आरोपी मुंजा कोंडीराम पोंदाळ (35) या दोघांमध्ये शनिवारी रात्री वाद झाला होता. त्यातून ते एकमेंकांना शिवीगाळ करत होते. याचाच राग धरून मुंजा याने बाळासाहेब याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली व त्यातच बाळासाहेब याचा मृत्यू झाला.
रविवारी गावातील सरपंचाने या घटनेची माहिती बोरी पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बोरी ग्रामीण रुग्णालयात डॉ.सीमा पन्हाड यांनी मृतदेहाचे विच्छेदन केले. आरोपी मुंजा पोंदाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी.व्ही.डोंगरे तपास करीत आहेत.

























































