
सामना प्रतिनिधी। नगर
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेत थाली नाद आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचार्यांच्या जोरदार निदर्शनांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला.
इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचार्यांना दहा हजार रुपयापेक्षा जास्त मानधन मिळावे, त्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा मिळावा, 25 पेक्षा कमी मुलांची पटसंख्या असलेली अंगणवाडी केंद्र बंद करून शेजारच्या अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा काढण्यात आलेला आदेश त्वरित रद्द करावा, सेवासमाप्तीच्या लाभाच्या रकमेमध्ये तीन पटीने वाढ करण्यात यावी, टीए डीएची रक्कम मिळावी, पाच व दहा वर्षाच्या वाढीव रकमेच्या फरकासह मानधन मिळावे, प्रत्येक महिन्याचे मानधन इतर कर्मचार्यांप्रमाणे महिन्याच्या एक तारखेला देण्यात यावे आदींसह 26 विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्यांनी जिल्हा परिषदेत आंदोलन केले. प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये मोठा असंतोष पसरला असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात एम.ए. पाटील, राजेश सिंह, मंगला सराफ, भगवान दवणे, सुषमा चव्हाण, सेतूतारका काटकाडे, सुनिता कुलकर्णी, विजया घोडके, मंगल ढगे, सविता सप्तर्षी, शोभा तरोटे, सुरेखा विखे, विमल साखरे, छाया शिंदे, शोभा लोकरे, सुनिता कुलकर्णी, विद्या घोडके आदिंसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
































































