
नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर बँकेचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता या ऑडिटमध्ये काय मुद्दे उपस्थित होतात, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
नगर अर्बन बँकेमध्ये कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणासंदर्भामध्ये आजी-माजी संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पुणे येथील शाखेमध्ये झालेल्या फसवणुकीसंदर्भामध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल झाला. या सर्व प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी बँकेच्या गैरव्यवहारासंदर्भात आरबीआय, केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करीत आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले गुन्हे हे आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यानुसार आर्थिक गुन्हे विभागाने सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास सध्या सुरू केला आहे. बँकेचा आर्थिक विषय असल्यामुळे याचे ऑडिट करणे गरजेचे आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाने याची खबरदारी घेत तत्काळ फॉरेन्सिक ऑडिट नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया निश्चित केली होती. ती प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाल्यानंतर आज मुंबई येथील एका नामांकित संस्थेला काम देण्यात आले असून, ऑडिटचे काम सुरू झाले आहे.
या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये यापूर्वी बँक आणि सरकारने स्वतंत्र ऑडिट केले आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तपास नगरच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आता तीन प्रकारचे वेगवेगळे गुन्हे दाखल असून, त्याची तपासणी सुरू झाली आहे.
या संदर्भात आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव म्हणाले, नगर अर्बन बँकेच्या संदर्भातील तपास सुरू केला असून, वेगवेगळ्या पातळीवर तपास सुरू आहे. बँकेकडून आवश्यक असणारी माहिती मागविण्यात आली आहे.


























































