
नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील सातगाव मधील 336 कुटुंब बेघर झाली आहेत. या कुटुंबांचं आंदोलन सुरू आहे, मात्र त्याकडे पालकमंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत. अखेर ही कुटुंबे आता नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी धडकणार आहेत. याप्रकरणी बुधवारी 3 मे रोजी नागपूर येथील फडणवीसांच्या घरासमोर संविधान पठण आंदोलन करणार असल्याची माहिती ‘युवा – परिवर्तन की आवाज’ संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांनी दिली.
‘2022 पर्यंत देशातील प्रत्येक गरिबाला स्वतःचे हक्काचे घर देणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. मात्र नागपूर मधील हिंगणा तालुक्यातील सातगाव मधील 336 कुटुंब बेघर झाली असून या कुटुंबांसमोर आता निवाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या महिन्यात 24 एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात सातगाव मधील या कुटुंबांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. त्या दिवसापासून हे कुटुंबीय नागपुरातील संविधान चौक येथे आंदोलन करत आहेत. प्रशासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून देखील आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ते नागरिक करत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने आता त्यांच्या घरासमोर संविधान पठण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती निहाल पांडे यांनी दिली.
सामनाची वेब आवृत्ती सामना ऑनलाइन सोबत बोलताना निहाल पांडे म्हणाले की, ‘मंगळवार 2 मे रोजी (आज) या बेघर झालेल्या कुटुंबांपैकी एक असलेल्या सोनेवाल कुटुंबीयांच्या मुलीचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. मात्र हक्काचे घरच नसल्याने या कुटुंबीयांनी निषेध म्हणून आंदोलनस्थळी भर रस्त्यात साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या साखरपुड्यासाठी त्यांनी थेट पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले आहे. निदान त्यानिमित्ताने तरी फडणवीस यांचे या आंदोलनकर्त्यांकडे लक्ष जाईल हा त्यामागचा हेतू आहे. मात्र तरी फडवीसांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे आता बेघर झालेल्या कुटुंबीयांनी फडणवीसांच्या घरी धडक देण्याचा निर्णय घेतला आहे’, असंही ते म्हणाले.

























































