व्हाट्सअप ग्रुपमधून काढल्याने ॲडमिनवर प्राणघातक हल्ला, नागपूरमधील धक्कादायक घटना

प्रातिनिधीक फोटो

व्हाट्सअप ग्रुपमधून बाहेर काढल्याचा राग धरून दोन सदस्यांनी ॲडमिनवर प्राणघातक हल्ला चढवल्याची घटना नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी आरोपी सदस्यांवर सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील करमचंद अलीमचंदानी आणि आरोपी चंद्रमणी यादव हे दोघेही महापालिकेत कंत्राटदार आहेत. सुनील अलीमचंदानी यांनी दोन व्हाट्सअप ग्रुप तयार केले. या ग्रुपमध्ये आरोपी चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव हे दोघेही सदस्य होते.

या ग्रुपमध्ये आरोपीनी तीन दिवसांपूर्वी काही एसएमएस टाकले. त्यावर ग्रुपमध्ये काही जणांनी आक्षेप घेतले. त्यामुळे सुनील यांनी दोघांनाही दोन्ही व्हाट्सअप ग्रुपमधून काढून टाकले. त्यामुळे दोघेही आरोपीनी रागाच्या भरात सुनील यांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.रारा

रात्री 8 वाजताच्या सुमारास चंद्रमणी आणि छत्रपती यांनी सुनील यांना फोन करून महापालिकेच्या कार्यालयाजवळ बोलावले. ग्रुपमधून काढून टाकल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर खुर्ची आणि छन्नीने सुनील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

डोक्यात छन्नीचा घाव लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुनील यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या