हिवाळी अधिवेशन – मुख्यमंत्री शिदेंवर हायकोर्टाचे ताशेरे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सावरली बाजू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना नागपुरातील 100 कोटींपेक्षा अधिक किमतीचे भूखंड अवघ्या दोन कोटी रुपयांत बिल्डरांना वाटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याचे पडसाद नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याला मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देत सारवासारव केली.

एकनाथ खडसे म्हणाले की, हे प्रकरण गंभीर असून हायकोर्टाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री असताना 83 कोटींचे भूखंड फक्त 2 कोटींमध्ये विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने न्यायालयीन मित्र म्हणूनही एकाची नेमणूक केली असून त्यानेही यात अनियमिततता असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

83 कोटींचा भूखंड 2 कोटींमध्ये देणे म्हणजे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. असे मी म्हणत नसून हायकोर्टाने हे ताशेरे ओढले आहेत. याआधी ज्यांच्यावर अशा स्वरुपाचे आक्षेप आले त्यांचे तुम्ही राजीनामे घेतले, अशी आठवण एकनाथ खडसे यांनी करून दिली.

एकनाथ शिंदे यांचा महाघोटाळा, नागपुरातील 100 कोटींचे भूखंड अवघ्या 2 कोटी रुपयांत बिल्डरांना वाटले!

एकनाथ खडसे यांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. हा भूखंडाचा विषय नाही, हा गुंठेवारीचा आहे. तसेच ही केस कोर्टासमोर असल्याचेही ते म्हणाले. फडणवीस यांच्या सारवासारवीने विरोधकांचे समाधान न झाल्याने सभागृहात गोंधळ उडाला. यानंतर विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांवर झालेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर नको! जयंत पाटील आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी