‘अंघोळीची गोळी’ टीमचा खिळेमुक्त झाडे उपक्रम; प्रजासत्ताकदिनी उपक्रमाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘अंघोळीची गोळी’ या उपक्रमाच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी जागोजागी पाणी वाचवण्याचे आवाहन करत असतात. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत या चार तत्वांवर अंघोळीची गोळीचे पथक काम करते. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी टीम मुंबई ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालये तसेच खेडोपाडी जाऊन लोकांना पाण्याचे महत्व पटवून देत असते. याच अंघोळीच्या गोळीच्या टीमने नुकतेच प्रजासत्ताकदिनी दादरमध्ये झाडांवरील खिळे काढण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला. झाडांनाही संवेदना असतात तेही सजीव आहेत पण फक्त त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या वेदना आम्हांला ऐकू येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वेदना कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सांगत खिळेमुक्त झाडाच्या संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम दादर येथे राबवला.

हा उपक्रम थोड्या काळापुरता मर्यादित नसून मुंबईतील विविध भागात तरुणांनी व नागरिकांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवावे असे आवाहन खिळेमुक्त झाडे टीमचे मुंबई समन्वयक तुषार वारंग यांनी यावेळी केले. पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडे मोहीम ठाणे आणि मुंबई परिसरात विस्तारण्यासाठी अंघोळीची गोळी टीम प्रयत्न करत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे. यापुढील काळात अनेक शहरांत खिळेमुक्त, पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त आणि आळेयुक्त झाडे ही मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे यावेळी विधी गोलटकर यांनी सांगितले.