भाजपाने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये – नाना पटोले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीत. काँग्रेसने दलित व मुस्लीमांचा व्होट बँक म्हणून वापर केला असे बोलण्याआधी एकनाथ शिंदे यांनी अभ्यास करायला हवा. स्वातंत्र्यापासून 60-65 वर्ष देशात सर्व जाती धर्माचे लोक भयमुक्त वातावरणात रहात होते ते काँग्रेस सरकारमुळेच. भाजपाच्या राज्यात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज जीव मुठीत घेऊन जगत आहे ह्याची शिंदे यांना जाणीव नाही. भाजपाने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे सरकारच असंवैधानिक आहे, भारतीय जनता पक्षाने कट कारस्थान करुन महाविकास आघाडीचे सरकार पाडून एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. शिंदे यांच्याकडे स्वतःचा पक्ष नाही, पक्षाचे चिन्ह नाही, ते सर्व चोरून आणलेले आहे. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या मेहरबानीवर मुख्यमंत्री बनले आहेत, जोपर्यंत शिंदे यांची गरज आहे तोपर्यंत ते त्यांचा वापर करुन घेतील व एकदा का त्यांची गरज संपली की ‘वापरा व फेकून द्या’ प्रमाणे एकनाथ शिंदे यांची अवस्था होईल. एकनाथ शिंदे यांना मोदी-शहांचे गुणगान गावे लागणार आहेत कारण शिंदे यांना त्याशिवाय पर्याय नाही. भाजपा सरकारच्या काळात देशभरात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढले आहेत याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी घ्यावी.

राहुल गांधी हे कधीही पंतप्रधान बनू शकणार नाहीत हे एकनाथ शिंदे यांचे विधानही हास्यास्पद आहे. लोकशाही व्यवस्थेत कोण पंतप्रधान होणार, मुख्यमंत्री, मंत्री होणार हे जनतेच्या हातात आहे. राहुल गांधी यांची लोकप्रियता देशातच नाही तर जगभर आहे, देशातील सर्वात जुन्या पक्षाचे ते नेते आहेत, त्यांनी ठरवले असते तर 2004 ते 2014 या दहा वर्षात ते केंव्हाही पंतप्रधान होऊ शकले असते परंतु ते गांधी आहेत आणि गांधी कुटुंबाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे. सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला हे एकनाथ शिंदे यांना माहित नाही का? लोकसभा निवडणुकीनंतर तुमची अवस्था काय असेल त्याची चिंता शिंदे यांनी करावी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची चिंता करु नये, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला.