रिफायनरीवरुन पुन्हा ठिणगी; समर्थनाचा मोर्चा निघाल्यास विरोधात मोर्चा काढणारच!

20

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

नाणार येथील रिफायनरी रद्‌द झाली असली तरी पुन्हा एकदा रिफायनरीच्या मुद्यावरुन रत्नागिरीमध्ये ठिणगी पडली आहे. पेट्रोकेमिकल रिफायनरी हवी या मागणीसाठी 20 जुलैला रत्नागिरीत काढण्यात येणार आहे. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोकणकन्या महामंडळानेही 20 जुलैला रत्नागिरीतच मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारली तरी रिफायनरी समर्थकांनी मोर्चा काढला तर त्यांची नांगी ठेचायला आम्ही येणारच, असा सज्जड इशारा कोकणभूमी महामंडळाने दिला आहे.

नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प सरकारने रद्‌द केलेला असताना अचानक रत्नागिरीमध्ये रिफायनरी समर्थकांनी एकत्र येत 20 जुलै रोजी रिफायनरीच्या समर्थनाकरीता रत्नागिरीत मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. या मोर्चाची बातमी कळताच रिफायनरी विरोधी समिती आणि कोकण भूमीकन्या महामंडळाने रिफायनरी समर्थकांना प्रत्युत्तर देण्याकरीता 20 जुलैलाच मोर्चा काढण्याचा इशारा दिली.

मंगळवारी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ़.प्रवीण मुंढे यांना मोर्चाला परवानगी मिळण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत आंदोलक सत्यजीत चव्हाण यांनी सांगितले की, रत्नागिरीतील अनेक मंडळे एकत्र येऊन रिफायनरी समर्थनासाठी मोर्चा काढत आहेत. त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हीही 20 जुलैला मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. आज त्या मोर्चाच्या परवानगीसाठी आम्ही जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटलो. समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच आम्हालाही मोर्चा काढण्याची परवानगी दिलेली नाही. पण जर 20 जुलै रोजी रत्नागिरीत रिफायनरी समर्थकांचा मोर्चा निघालाच तर आम्हीही 20 जुलैला रत्नागिरीत येणार आणि मोर्चा काढणारच असा निर्धार सत्यजीत चव्हाण यांनी व्यक्त केला.

रिफायनरी हवीशी असेल तर ती रत्नागिरीत आणा
रिफायनरी प्रकल्पविरोधी प्रमुख आंदोलक मंगेश चव्हाण यावेळी म्हणाले की, रिफायनरी कोणाला हवी हे त्यांचे व्यक्तीगत मत आहे. पण नाणारमध्येच रिफायनरी हवी असे सांगण्याचा कोणाला हक्क नाही. जर कुणाला रिफायनरी हवी असेल तर त्यांनी ती रत्नागिरीत आणावी. आम्ही गेली दोन वर्षे आंदोलन करुन रिफायनरी रद्‌द केली आहे. मग रिफायनरी त्यांना नाणारमध्येच कशाला हवी आहे, असा खोचक प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. कोणाच्या पोटावर वरवंटा आणून रिफायनरी आणून काही साध्य होणार नाही, असे मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

रिफायनरी प्रकल्प होणार म्हणून मोठ्या प्रमाणात त्या परिसरात गुंतवणूक झाली आहे. त्या गुंतवणूकदारांचा मोठा दबाव तेथील एजंटवर सुरु आहे. त्यामुळेच हा सर्व खटाटोप सुरु असल्याचा आरोप नितीन जठार यांनी केला. यावेळी कोकणभूमीकन्या महामंडळाच्या अध्यक्षा शेवंती मोंडे, सचिव सोनाली ठुकरुल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या