
देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरण, विविध स्पर्धा परीक्षांतील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि सामाजिक कार्यकर्ते तथा वैज्ञानिक सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आज (२० जुलै २०२६) दुपारी ११ वाजता नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर सर्वपक्षीय सत्याग्रह व आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ थांबवावा, या प्रमुख मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला. आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नांदेड उत्तरचे तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, युवासेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी सचिन पाटील, श्रीपाद रायवार, काँग्रेसचे सुरेंद्र घोडजकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलकांच्या हातात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, नीट पेपर लीक घोटाळा बंद करा, देशाच्या भविष्यासोबत खेळ थांबवा, बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टीच्या पीएचडी फेलोशिप सर्वांना द्या, टीईटी परीक्षा एमपीएसी मार्फत वर्षातून दोन वेळा घ्या अशा आशयाचे फलक झळकत होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदेड उत्तरचे तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. गोरगरिबांच्या मुलांनी डॉक्टर, प्राध्यापक, अधिकारी होऊ नये, हाच या सत्ताधार्यांचा हेतू दिसतो. पेपरफुटी, भ्रष्टाचार, राम मंदिरातील चोरी, कोट्यवधींचे उड्डाणपूल वर्षभरात कोसळतात. पण सरकारला स्वतःची चूक मान्य करण्याची हिंमत नाही. अशा घोटाळेबाज सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी जनता एकत्र आली पाहिजे. भारतीय संविधानाचा विजय असो.
युवासेनेचे सचिन पाटील म्हणाले, दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला नांदेडचा ठाम पाठिंबा आहे. हा कोणत्याही एका पक्षाचा लढा नाही, तर देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. घोटाळेबाज सरकारला जनता योग्य वेळी धडा शिकवेल.
काँग्रेसचे सुरेंद्र घोडजकर यांनी आरोप केला की, सोनम वांगचूक यांना नाट्यमय पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात आहे. पेपरफुटी घडवून परीक्षा रद्द करायच्या आणि भरतीच टाळायची, हा सरकारचा डाव आहे. विरोधकांनी एकत्र येऊन या अन्यायाविरोधात निर्णायक लढा उभारला पाहिजे.
आंदोलनादरम्यान मोदी सरकार मुर्दाबाद, सोनम वांगचूक तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, जय भीम, जय संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणांनी महात्मा फुले पुतळा परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा कथित अन्याय थांबवण्याची मागणी केली.





























































