
कृषिप्रधान देश असलेल्या या भूमीत शेतकऱयांच्या आजच्या ज्वलंत प्रश्नावर साहित्यिक, कलावंत, विचारवंत यांच्यात सखोल विचारमंथन व्हावे, यातून शेतकरी चळवळीला कालसंगत दिशा मिळावी. यासाठी करवीर नगरीत ‘नांगरट साहित्य संमेलन’ होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार प्रतिष्ठान यांच्यामार्फत येत्या 4 जून रोजी हे अनोखे संमेलन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
स्वामी विवेकानंद कॉलेज येथे हे संमेलन होत असून, ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हे ‘नांगरट साहित्य संमेलन’ होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहेत. एकदिवसीय संमेलनाला उत्सवी स्वरूप न देता शेतकऱयांच्या मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावी. यातून भविष्यकालीन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरावी. शेतकऱयांचे प्रश्न सुटण्यासाठी ठोस उपाययोजना पुढे याव्यात. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर साहित्यिकांनी लिहावे. मार्गदर्शन करावे, यासाठी हे संमेलन तीन सत्रांत होणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

























































