
2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडलेले नारायण राणे यांची सभा उधळल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने शुक्रवारी 5 शिवसैनिकांची निर्दोष सुटका केली. 18 वर्षांपूर्वीच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींची ओळख तसेच घटनेतील त्यांच्या कथित सहभागासंबंधी विसंगती दिसून येतात, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नोंदवले. शिवसेनेतून गद्दारी करून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांची प्रभादेवी येथील ‘सामना’च्या कार्यालयाजवळ सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेजवळ शिवसैनिकांनी निदर्शने केली होती. त्यावेळी दोन गटांत धक्काबुक्की झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या 5 शिवसैनिकांना गुरुवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निर्दोष मुक्त केले. अशोक केळकर, लक्ष्मण भोसले, अजित कदम, दत्ताराम शिंदे आणि शशी फडते अशी निर्दोष सुटका झालेल्या शिवसैनिकांची नावे आहेत.
























































