हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचे पाप काँग्रेसने केले, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नागपूर

हिंदुत्वाची परंपरा पाच हजार वर्षांची आहे. या परंपरेनेच जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. हिंदू हा कायमच सहिष्णू म्हणून ओळखला जातो, मात्र काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचे पाप केले. हिंदूंना दहशतवादी ठरवून बदनाम केले असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथे महायुतीच्या सभेत केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथून महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. शिवसेना-भाजप युतीच्या विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वावलंबी विद्यालय मैदानावर रणरणत्या उन्हात प्रचंड जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, चंद्रपूरचे उमेदवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, अमरावतीचे उमेदवार शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, वर्धाचे उमेदवार रामदास तडस, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, इंग्रजांनीही हिंदूंची सहिष्णुता मान्य केली हाती, मात्र काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द ‘व्होट बँक’ पॉलिटिक्सकरिता वापरून पाच हजार वर्षांची हिंदुत्वाची परंपरा बदनाम केली. काँग्रेसने हिंदुत्वाचा अपमान केला असा आरोप करीत अशा काँग्रेसला तुम्ही निवडून देणार काय, असा सवाल पंतप्रधानांनी यावेळी केला.

काँगेसने वापरलेल्या ‘हिंदू दहशतवाद’ या मुद्दय़ाचा आता पर्दाफाश झाला आहे. न्यायालयानेच या प्रकरणातील आरोपींना मुक्त केले आहे. याकडे लक्ष वेधत पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसला मैदान सोडून पळ काढावा लागत आहे. जिथे हिंदू मतदार लक्षणीय संख्येत आहेत तिथे काँग्रेसला उमेदवारच मिळत नाहीत आणि ज्यांना उमेदवारी दिली जाते तेही लढायला तयार नाहीत. नव्हे, त्यांची लढायची हिंमत नाही असा टोला मोदी यांनी लगावला.

पुतण्याच्या हातून शरद पवारांची ‘हिट विकेट’
या सभेत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार हे देशातील सर्वांत अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. ते जे काही बोलतात, जे काही करतात ते विचारपूर्वक असते. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे पवार यांनी लोकसभा लढविण्यास नकार दिला. निवडणुकीची हवा कोणत्या दिशेला आहे हे ओळखून ते मैदान सोडून पळाले असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक युद्ध सुरू झाले आहे. शरद पवार यांची पक्षावरील पकड आता सुटत चालली असून आता त्यांचा पुतण्या पक्ष ताब्यात घेऊ पाहत आहे अशी टीका पंतप्रधानांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली. कौटुंबिक युद्धामुळे राष्ट्रवादीला तिकिटे देताना अडथळे आले. पुतण्याच्या हातून शरद पवारांची ‘हिट विकेट’ गेली अशी टीका पंतप्रधानांनी केली.

महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार म्हणजे कुंभकर्णाची झोप होती. सहा महिने एकजण जागा व्हायचा आणि पैसे खाऊन झोपायचा, मग दुसरा जागा व्हायचा आणि पैसे खायचा. या लोकांनी सिंचन, मुद्रांक, रस्ते, शिक्षण असा कोणताही विभाग सोडला नाही असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.

पवार कुटुंबाने मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या
शरद पवार 10 वर्षे देशाचे कृषिमंत्री असतानाही महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या आत्महत्या का थांबवल्या नाहीत, असा सवाल मोदी यांनी केला. स्वतः शेतकरी कुटुंबातील असूनही शरद पवार शेतकऱयांना विसरले. शेतकऱयांना न्याय देण्याऐवजी पवार कुटुंबाने मावळमध्ये शेतकऱयांवर गोळ्या चालवण्याचे आदेश दिले होते असा घणाघातही पंतप्रधानांनी केला.

धरणातल्या पाण्याबाबत अजित पवारांनी काय म्हटले होते…
शेतीसाठी पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी अजित पवारांनी काय म्हटले होते हे तुम्हाला माहीत आहे ना! अजित पवार जे म्हणाले होते ते मी व्यासपीठावरून बोलू शकणार नाही. कोणीही बोलू शकणार नाही असे सांगून पंतप्रधान मोदींनी अजित पवारांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याची आठवण करून दिली.