एका कुटुंबासाठी आणीबाणी लादली! मोदी यांचे काँग्रेसवर शरसंधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-mumbai-e
फाईल फोटो

सामना ऑनलाईन,मुंबई

एका घराण्यासाठी संपूर्ण देशावर आणीबाणी लादली गेली. घटनेचा दुरुपयोग झाला आणि आता तेच ‘संविधान खतरे मे हैं’ अशी भीती निर्माण करीत आहेत. पंचायत ते संसद एकाच कुटुंबाची सत्ता होती. मात्र आता ४०० वरून ४४ वर आल्यावर काँग्रेसकडून निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेवरही सूड उगवला जात आहे. तेव्हाची आणीबाणी आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधातच महाअभियोग आणण्याची काँग्रेसची मानसिकता अद्याप बदललेली नाही, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर केली.

भाजपच्या वतीने बिर्ला मातोश्री हॉल येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आणीबाणीवरील चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, लोकशाही दिन हा कोणत्याही पक्षावर टीका करण्यासाठी नाही तर आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना जाणवलेली धग आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी हा आहे. त्या काळात एका परिवारासाठी संविधानाचा दुरुपयोग करण्यात आला. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर या परिवाराला आपली खुर्ची जाणार याची भीती वाटू लागली की त्यांचा अकांडतांडव सुरू होतो. देश संकटात आहे, संविधान संकटात आलेय अशा आरोळय़ा ठोकायच्या आणि यापासून आम्हीच तुम्हाला वाचवू शकतो अशी बतावणी करण्यात हा परिवार आघाडीवर असल्याचे सांगत त्यांनी गांधी घराण्याला लक्ष्य केले.

स्वतःवर खटले दाखल झाले म्हणून न्यायव्यवस्था बदनाम करताहेत

पंचायतपासून संसदेपर्यंत एकेकाळी सत्ता असलेल्या या परिवाराला आपल्यावरही खटले दाखल होऊ शकतात, आपणही जामिनावर बाहेर येऊ शकतो असे कधीच वाटले नव्हते. तेव्हा आपल्यावर खटले दाखल झाल्याने देवासमान समजल्या जाणाऱ्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठsलाच धक्का पोहोचविण्याचे काम या परिवाराने सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरच महाभियोग आणला तर खालचे न्यायाधीश आपोआपच गप्प बसतील अशी यांची मानसिकता असल्याचे मोदी म्हणाले.

किशोरकुमारांवरही बॅन आणला

आणीबाणीच्या काळात गायक किशोरकुमार यांना काँग्रेसने एका कार्यक्रमासाठी गायला बोलावले, मात्र त्यांनी याला स्पष्ट विरोध केल्यानंतर राष्ट्रीय रेडिओवरून किशोरकुमार यांची गाणी बॅन करण्यात आली. आपल्याविरुद्ध जनमत असल्याची भीती काँग्रेसला इतकी होती की आणीबाणीच्या २० वर्षांनंतर आलेल्या ‘आँधी’ या चित्रपटालाही काँग्रेसकडून विरोध करण्यात आला असल्याचे सांगतानाच ज्यांनी लोकशाहीला हरताळ फासला त्यांच्याकडून लोकशाहीच्या प्रतिबद्धतेची अपेक्षाच करता येणार नाही असे मोदी म्हणाले.

ही तर काँग्रेसची मोडस् ऑपरेंडी

ज्यांनी संविधान पूर्णपणे चिरडलं, ज्यांनी लोकशाहीला तुरुंगात टाकलं तेच आज संविधान खतरे मे हैंची हाक देत आहेत. दलित संकटात आहेत अशी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगालाही बदनाम केले जात आहे. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. मात्र यांचा जरा पराभव झाला की ईव्हीएमला कारणीभूत ठरवले जात आहे. ही या काँग्रेसची मोडस् ऑपरेंडी असून हे सर्व काल्पनिक आहे. एवढय़ा वर्षांत काँग्रेसला कधी लोकशाही दिन साजरा करावेसे वाटले नाही, पण तो लोकशाही दिन आमची सत्ता आल्यानंतर आम्ही सुरू केला, असे मोदी म्हणाले.