नासाला खरेदी करायचीय चंद्रावरील दगड–माती, उत्खननासाठी काढणार निविदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रावरील दगड, माती आणि अन्य खनिजे खरेदी करण्याची योजना अमेरिकेतील ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने आखली आहे. त्यादृष्टीने त्यांनी पाऊले उचलली असून लवकरच उत्खननासाठी निविदा काढण्यात येणार आहे. जगभरातील कोणत्याही खासगी संशोधन कंपन्यांना या निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार आहे.

चंद्रावर उत्खनन करण्याची ही मोहीम म्हणजे नासाच्या ध्येयाचा एक भाग आहे. चंद्रावरील उत्खननास कायदेशीर परवानगी मिळावी. जेणेकरून भविष्यात चंद्रावरील बर्फ, हिलियम आणि अन्य खनिजांच्या उत्खननासाठी अधिकार मिळतील. तसेच अंतराळप्रवास संबंधित मोहिमेत मदत मिळू शकेल. हा त्यामागील मुख्य हेतू आहे. उत्खननाच्या संसाधनांना नासा स्वतःची मालमत्ता म्हणून पाहत आहेत. या मोहिमेसाठी किती पैसे खर्च करायचे हे नासाने अद्याप ठरवलेले नाही. मात्र निविदेत सहभागी होणाऱया कंपन्यांच्या आधारावर ही रक्कम ठरवली जाईल.

1967 मध्ये संयुक्त राष्ट्राने आऊटर स्पेस ट्रिटी म्हणजेच अंतराळाच्या बाह्य सुरक्षिततेसाठी करार केला होता. चंद्र आणि इतर खगोलीय घटकांसह संपूर्ण अंतराळ हे संशोधनासाठी सर्व देशांसाठी खुले आहे. सर्व देश याचा समान वापर करू शकतात. कोणत्याही देशाला आपलं सार्वभौमत्व जाहीर करता येणार नाही. मात्र या करारात उत्खननाबाबत कोणताही उल्लेख नाही. अंतराळातील स्रोतांच्या उत्खनन आणि व्यापाराबाबत नवीन नियमावली तयार करण्याची वेळ आली आहे, असे मत नासाचे प्रशासकीय प्रमुख जिम ब्राईडेंन्स्टाईन यांनी व्यक्त केले. नासाच्या या प्रस्तावित निविदेसाठी टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांची स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी व एस्ट्रोबायोटिक्स या कंपन्या इच्छुक आहेत.