
पाकिस्तानी गँगस्टरचा दिल्ली आणि पंजाबमधील घातपाताचा मोठा कट एटीएसने उधळून लावला. याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली आणि पंजाबमधील रुग्णालये आणि पक्षांच्या कार्यालयांना बॉम्बने उडवण्याचा कट रचण्यात आला होता. महकाब, गगनदीप सिंग उर्फगुर्री, शाहरुख आणि मुशर्रफ अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीच्या सांगण्यावरून दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठ्या हल्ल्यांचा कट रचला जात होता. मात्र चार संशयितांच्या अटकेनंतर घातपाताची योजना उघडकीस आली. शहजाद भट्टी आणि आबिद जाट या दोघांना मिळून हिंदुस्थानात मोठे हल्ले घडवून आणायचे होते. यासाठी भट्टीने हिंदुस्थानातील आपल्या माणसांना कामावर ठेवले आहे. पंजाबमधील गर्दीची रुग्णालये, एका राजकीय पक्षाचे कार्यालय आणि एका शाळेचा मालक या गुंडांच्या टार्गेटवर होते.
मेहकाब आणि गगनदीप ऊर्फ गुर्री या दोघांनी नियोजित ठिकाणांची रेकी केली होती. त्या ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटोही काढून तसेच त्या ठिकाणाची जीपीएसची माहिती पाकिस्तानात असलेल्या शहजाद भट्टीला पाठवण्यात आले. शस्त्रे आणि स्फोटकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी शाहरुख आणि मुशर्रफ यांच्यावर होती. रुग्णालयात स्फोट कसे घडवून आणायचे यावर ते सोशल मीडियावर संशोधनही करत होते. शस्त्रे आणि स्फोटके हाती आल्यानंतर तात्काळ हल्ला केला जाणार होता.
दिल्ली आणि पंजाबमधील गर्दीची रुग्णालये, एका राजकीय पक्षाचे कार्यालय आणि पंजाबमधील एका शाळेच्या मालकाला लक्ष्य करण्याची योजना होती. मात्र, शाळेच्या मालकाचे नाव आरोपींना अद्याप सांगण्यात आले नव्हते. शहजाद भट्टी उत्तर प्रदेशातही हत्या आणि मोठ्या हल्ल्यांची योजना आखत होता. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) कारवाई सुरू आहे.




























































