
वंचित मुलांना शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे काळाची गरज आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानक्षेत्रातील ज्ञान दिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व भारतीय भटके-विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
भारतीय भटके-विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने आज ‘फुले- आंबेडकर साहित्य पंचायत पुरस्कारां’चे वितरण करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना ‘जीवनगौरव’, ‘फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार’ खासदार कुमार केतकर यांना, तर ‘आयु. यलाप्पा वैदू स्मृती युवा पुरस्कारा’ने अरुण जावळे यांना शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने, भाई शैलेंद्र माने, जीवन बोराटे, यशवंत माने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘‘भटक्या संस्थेत गरजू मुलांना शिक्षण व निवाऱयाची सोय करून लक्ष्मण माने उपेक्षित वर्गाला साक्षर करीत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. सद्यःस्थितीत रयत संस्थेत चार लाख 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, 46 टक्के मुली शिक्षण घेत आहेत. भटक्या संस्थेने फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार देऊन समतेचा सन्मान केला आहे,’’ असे ते म्हणाले.
कुमार केतकर म्हणाले, ‘‘मागील काही दिवसांत माध्यमिक शाळांमधील मुले कमी होत असून, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होणे हे समाजासाठी घातक आहे. समाजात मध्यमवर्गीय मते जास्त असून, ती मते मिळविणारा पक्ष जास्त काळ सत्तेत राहील. महाराष्ट्रात आलेल्या सनातनी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी चळवळींना पाठिंबा दिला पाहिजे,’’ असे आवाहनही त्यांनी केले.
सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘‘मागील काही वर्षांत जागतिकीकरणाच्या जमान्यात भटका समाज उपेक्षित राहिला असून, मोठय़ा प्रमाणात विस्तापितही झाला आहे. मात्र, आमच्या समाजाला संधी मिळाल्यावर त्याचं सोनं करतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे. याचबरोबर सध्या सत्ताधाऱयांविरोधात लढण्यासाठी आणि राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेत येणे आवश्यक आहे. त्यासाठी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची गरज आहे,’’ असे अंधारे यांनी सांगितले.
लक्ष्मण माने म्हणाले, ‘‘मी आयुष्यभर चळवळीत काम केले आणि पुढेही करणार आहे. गरिबांना शिक्षण दिले पाहिजे, यासाठी गेल्या 40 वर्षांपासून पवार व आमचे संबंध जिव्हाळ्याचे राहिले आहेत.’’
सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर
राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर अश्लाघ्य पद्धतीने टीका करूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. या प्रवृतीविरोधात विधिमंडळातही कोणी आवाज उठविला नाही. मंत्री अब्दुल सत्तार, संजय शिरसाट महिलांबाबत चुकीची भाषा वापरत असल्याचे सांगत असताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले. भटक्या समाजाचे प्रश्न चव्हाटय़ावर आणण्यासाठी चळवळीत असून, मंत्रिपद व पुरस्कारासाठी काम करीत नसल्याचेही अंधारे यांनी सांगितले.




























































