
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यासंदर्भात नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक राजर्षी शाहू सभागृह, शिवाजी मंदिर येथे रविवारी प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत नाटय़ परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली. तसेच मार्च 2023 पर्यंत नरेश गडेकर यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
सध्याच्या नियामक मंडळाची मुदत मार्च 2023 मध्ये संपत आहे. त्यामुळे 2023 ते 2028 ची पंचवार्षिक निवडणूक घेण्याचे आजच्या नियामक मंडळ सभेत ठरविण्यात आले. यासाठीची मतदार यादी व घटनेप्रमाणे निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेल्या चेंज रिपोर्टनुसार नियामक मंडळाचे 47 सदस्य आहेत. त्यातील 35 जण आजच्या बैठकीला हजर होते, तर उर्वरित चार जणांनी कळवले होते, अशी माहिती प्रवत्ते भाऊसाहेब भोईर यांनी दिली.
प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे हे परिषदेच्या घटनेप्रमाणे कामकाज करीत नसल्याने त्यांचे प्रमुख कार्यवाह या पदाचे सर्व अधिकार सभेने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे सर्व अधिकार सहकार्यवाह यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आले.
n निवडणूक अधिकारी निवडीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत भाऊसाहेब भोईर, सविता मालपेकर, सुनील महाजन, विजय कदम, शामनाथ पुंड असून येत्या पाच दिवसांत निवडणूक अधिकाऱयाचे नाव जाहीर होणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे.


























































