भरधाव कंटेनर दुभाजकावर आदळला; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर पुन्हा अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवले पूल परिसरात रविवारी रात्री झालेल्या दोन अपघातांत भरधाव ट्रकने 48 वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी दुपारी पुन्हा किरकोळ अपघात झाला. भरधाव कंटेनर दुभाजकावर आदळल्याने दोन वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. बाह्यवळण मार्गावरील अपघातानंतर यंत्रणांना खडबडून जाग आली आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आराखडा बनविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने सोमवारी बाह्यवळण मार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी, 22 नोव्हेंबर रोजी बाह्यवळण मार्गावर किरकोळ अपघात झाला. भरधाव कंटेनर दुभाजकावर आदळला. या घटनेत दोन वाहनांचे नुकसान झाले असून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने ट्रक तसेच वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

डिझेल वाचविण्यासाठी ऐन उतारावर भरधाव ट्रक थांबवून अपघात करणाऱ्या चालकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडला होता. मनीराम छोटेलाल यादव (रा. मध्यप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.