नवी मुंबई महापालिकेचा ‘अनारोग्य’ कारभार, टायफाईडच्या लसीकरणावर सहा कोटींची उधळपट्टी

सामना ऑनलाईन, नवी मुंबई

महापालिकेच्या रुग्णालयाची अवस्था सध्या व्हेंटिलेटरवर टाकलेल्या रुग्णासारखी आहे. कोणतेही उपचार धड होत नाहीत. सामान्य शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना थेट सायन आणि केईएम हॉस्पिटल गाठावे लागते. तासन्‍तास रांगेत उभे राहून रुग्णांना औषधं मिळत नाहीत. यामध्ये सुधारणा करण्याऐवजी महापालिका प्रशासन सहा कोटी रुपये खर्चून टायफाईडची लसीकरण मोहीम राबवणार आहेत. विशेष म्हणजे शहरात टायफाईडचे फक्त तीन रुग्ण आढळले असताना होत असलेल्या भरमसाट खर्चामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने येत्या १४ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान टायफाईड लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेंतर्गत शहरातील चार लाख मुलांना टायफाईडची लस देण्यात येणार आहे. दोन टप्प्यांत राबवण्यात येणार्‍या या मोहिमेवर महापालिका सहा कोटी खर्च करणार आहे.

केसपेपरसाठी रांगा

बेलापूर, नेरळ आणि ऐरोली येथे गेल्या चार महिन्यांपासून बांधून तयार असलेली रुग्णालये या विभागाला सुरू करण्यात आलेली नाहीत. वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी जाणार्‍या रुग्णांना दोन-दोन तास केसपेपरसाठी रांगेत ताटकळत थांबावे लागते. रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी आहे. न्युरोसर्जन आरोग्य विभागाला शोधूनही सापडत नाही. या सर्व उणिवांकडे दुर्लक्ष करून महापालिकेने चमकेशगिरी करण्यासाठी टायफाईडच्या लसीकरणावर सहा कोटी रुपयांचा खर्च करण्याचा घाट घातल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

प्रयोग पालिका

नवी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रुग्णालयांची अवस्था असून नसल्यासारखी झाली. आरोग्य सेवा सुधारण्याऐवजी सत्ताधारी आणि प्रशासन नवीन प्रयोगाच्या मागे लागले आहे. त्यामुळे ही महापालिका आहे का प्रयोग पालिका हेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी व्यक्त केली.