समीर वानखेडेंवर गंभीर आरोप; चौकशी आवश्यकच, एनसीबीचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

एनसीबीच्या मुंबई युनिटचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे 25 कोटींच्या लाच प्रकरणात ईडीने चौकशी सुरू ठेवली असताना एनसीबीनेही चौकशीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप आहेत. याबाबत त्यांची चौकशी आवश्यकच आहे, असा दावा करीत एनसीबीने बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या तसेच ड्रग्ज बाळगणाऱया नायजेरियन नागरिकावर कारवाई केल्याप्रकरणी वानखेडेंची एनसीबीने चौकशी सुरू केली होती. या अनुषंगाने तपास यंत्रणेने त्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून यंदा मार्चपर्यंत आठ नोटिसा बजावल्या. तसेच एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्यासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले. त्याला आव्हान देत वानखेडे यांनी अॅड. राजीव चव्हाण यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा दावा वानखेडेंनी केला आहे. या दाव्याचे खंडन करीत एनसीबीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.