पोलीस डायरी : एनसीबीच्या वसुली रॅकेटचा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार

प्रख्यात सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यास केंद्र शासनाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने भरसमुद्रात नांगर टाकून असलेल्या कार्डेलिया क्रुझवरील रेव्ह पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या व बाळगल्याच्या आरोपावरून गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर (2 व 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री) महिन्यात अटक करून 26 दिवस तुरुंगामध्ये डांबले होते, परंतु आर्यन खानविरुद्ध ड्रग सेवन केले किंवा बाळगले असल्याचे कोणतेच पुरावे एनसीबीच्या हाती न लागल्यामुळे एनसीबीने त्यास नुकतीच क्लीन चिट दिली आहे. एनसीबीकडून गेल्या आठवडय़ात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून आर्यन खानसह 6 जणांची नावे वगळण्यात आली आहेत तर 14 जणांविरुद्ध पुरावे मिळाल्याने त्यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँगेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी कार्डेलिया बोटीवरील धाडीबाबत शंका व्यक्त करून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. शाहरुख व रेव्ह पार्टीत भाग घेणाऱ्या व्हीआयपींकडून करोडोची खंडणी वसूल करण्यासाठीच ही धाड टाकण्यात आली असल्याचाही नवाब मलिक यांनी आरोप केला होता. त्यात आता तथ्य असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात एकटे समीर वानखेडे नसून या मागे राज्यातील व केंद्रातील बडय़ा राजकीय व्यक्तींचाही समावेश आहे असे सांगण्यात येते.

कार्डेलिया बोटीवरील रेव्ह पार्टीत धाड घालण्यासाठी समीर वानखेडे यांनी सरकारी पंचांना सोबत न घेता राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना व के.पी. गोसावीसारख्या गुन्हेगारांना घटनास्थळी नेऊन पंचनामे केले. ज्याच्यावर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत अशा के.पी. गोसावीने तर आर्यन खानला ताब्यात घेऊन त्याचा व्हिडीओ वायरल केला. आर्यन खानला मदत व्हावी म्हणून शाहरुख खानने रातोरात आपल्या पीएला गोसावीकडे पाठविले. त्यावेळी कोटय़वधींचा व्यवहार झाला. तोपर्यंत आर्यन खानच्या अटकेचा व्हिडीओ वाऱ्यासारखा वायरल झाला आणि वानखेडे व एनसीबीचे पितळ उघडे पडले. सुशांतसिंग प्रकरणाप्रमाणे आघाडी सरकारला बदनाम करण्याचा हा आणखी एक राष्ट्रीय कट उघड झाला.

अभिनेता सुशांत सिंग याने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे माहीत असूनही विरोधकांनी आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी देशपरदेशातून दीड लाखाच्या वर खोटी ट्विटर अकाऊंट उघडून आघाडी सरकारवर हल्ला करण्यास सुरुवात केली. सुशांत सिंगने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून करण्यात आला असे ट्विटरद्वारे बनावट नावाने आरोप करण्यात आले. आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला. ‘सीबीआय’ चौकशी सुरू केली, परंतु आज दोन वर्षे उलटून गेली तरी त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. राज्य सरकार, त्यांच्या तपास यंत्रणा कुचकामी आहेत हे दाखविण्यासाठी केंद्र सरकारने सीबीआय, ईडी, एनआयएसारख्या यंत्रणांचा वापर केला. आघाडी सरकारचे खच्चीकरण करण्याचा गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे, परंतु त्यात त्यांना यश मिळालेले नाही. आघाडी सरकार पडले नाही. उलट सुशांत सिंग व आर्यन खान प्रकरणात केंद्र शासनाची नाचक्की झाली आहे.

सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्ती या अभिनेत्रीचा तर प्रचंड छळ करण्यात आला. आघाडी सरकारमधील मंत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तिला जेलमध्ये टाकण्यात आले, परंतु तरीही एनसीबीच्या हाती काहीच लागले नाही. यासाठी समीर वानखेडेंचा वापर करण्यात आला, परंतु आता समीर वानखेडेच अडकले आहेत. तेव्हा सचिन वाझे प्रकरणात आकांडतांडव करणारे विरोधक आता गेले कुठे? आता ते गप्प का? समीर वानखेडे कुणाचे ब्ल्यू आईड् बॉय आहेत? नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा ‘फर्जीवाडा’ उघड केला म्हणून मलिकांविरोधात ‘ईडी’ने कारवाई केली. त्यांना जेलमध्ये टाकले. तरीही आघाडी सरकार पडले नाही. उलट केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून आर्यन खान व बोटीवरील पार्टीत भाग घेणाऱ्या एनसीबीची खोटी कृत्यं चव्हाट्यावर आली. जेव्हा अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय असतो तेव्हा वैद्यकीय तपासणी केली जाते, परंतु कार्डेलिया क्रुझवरील रेव्ह पार्टीत भाग घेणाऱ्या आर्यन खानसह अटक करण्यात आलेल्या कोणत्याही तरुण-तरुणींची मेडिकल टेस्ट एनसीबीच्या समीर वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली नाही. उलट के.पी. गोसावी हा त्यांचा दलाल व राष्ट्रीय पक्षाचे काही कार्यकर्ते शाहरुख खान व अन्य व्हीआयपींकडून करोडो रुपये उकळण्यात 2 व 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री व्यस्त होते. याला एनसीबीचे केंद्र सरकारचे वसुली रॅकेट म्हणणार नाही तर काय म्हणणार? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा ब्ल्यू आयड् बॉय सचिन वाझेवर वसुलीचा आरोप झाला. त्याच्या नावाने बोंब मारणारे अंध भक्त (समीर वानखेडेला एनसीबीच्या समितीने दोषी ठरवूनही) आता का मूग गिळून आहेत? सारेच कोडे आहे. पाशवी मनुष्यबळ असले… absolute majority असली की लोकशाहीचा असा गळा घोटला जातो. देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे असेच म्हणावे लागेल.

[email protected]