लोक बदलाच्या विचारात; मोदींनी धसका घेतला, शरद पवार यांचा जोरदार पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या अस्वस्थता आहे. अनेक राज्यांत लोक बदलाच्या विचारात आहेत. जनतेला बदल हवाय. सबंध देशातील चित्र बघितले तर मोदी किंवा त्यांच्या विचाराचे पक्ष कुठेही सत्तेत दिसत नाहीत. गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात फोडाफोडी करून सरकार आणले. देशातील बहुसंख्य राज्यांत भाजपकडे सत्ता नाही. हे चित्र सगळीकडे दिसतेय. याचा धसका मोदींनी घेतलाय. त्यामुळेच ते चुकीच्या गोष्टी मांडत असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लगावला.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी शिर्डी येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना केलेल्या आरोपांना शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधानांना देशात काय घडतंय याचे वास्तव चित्र समजले पाहिजे, पण त्यांनी जे वक्तव्य केले त्यातून त्यांना वास्तवतेची जाण आहे असे वाटत नाही, असा टोला लगावतानाच देशाचा कृषीमंत्री म्हणून यूपीए सरकारच्या दहा वर्षांत आपण केलेल्या कामांची यादीच शरद पवार यांनी वाचून दाखवत मोदींनी केलेली टीका आणि आरोपांतील हवाच काढली.

विधानसभा निवडणुकीत बदल

पाच राज्यांतील निवडणुका आणि त्यापाठोपाठ होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या संदर्भाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक राज्यांत बदल दिसतोय, पण लोकसभा निवडणुकांबद्दल पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही. विधानसभेतील ट्रेंड पुढल्या निवडणुकीत दिसतोय, पण त्याबद्दल अधिक माहिती माझ्याकडे नाही, असे पवार म्हणाले.

इंडिया आघाडीकडून लोकांना अपेक्षा

इंडिया आघाडीकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे आम्हाला अधिक जोमाने काम करावे लागेल. मी उद्याच दिल्लीला जाणार असून इंडिया आघाडीतील आम्ही काही लोक यासंदर्भात चर्चा करणार आहोत. राज्यात फिरत असताना लोकांकडूनच एकत्र येऊन पर्याय द्या असे सांगितले जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडी म्हणून आम्हाला आणखी काम करावे लागेल, असे पवार म्हणाले.

वंचितसह पुढे जावे

प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आणि इंडिया आघाडीत घेणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारल्यावर पवार म्हणाले, आंबेडकर यांना आघाडीत घेण्यावर चर्चा झाली नाही. सहकाऱयांशी चर्चा केली जात आहे, पण राष्ट्रवादी कॉँग्रेस म्हणून माझे वैयक्तिक मत आहे वंचितसह पुढे जावे.

मराठा आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग काढावा

मराठा आरक्षणाकरिता राज्यात सध्या वेगवेगळय़ा प्रकारे आंदोलने सुरू आहेत. परिस्थितीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरिता सरकारने सामंजस्याची भूमिका घ्यावी. अतिरेकीपणा करू नये. ज्यांची मागणी आहे ते आणि सरकारने बसून चर्चा करावी यातून मार्ग काढावा.

पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य सत्यावर आधारित नाही. माहिती नसताना वक्तव्य करण्यास धाडस लागतं आणि पंतप्रधानांनी ते धाडस दाखवलं आहे. पंतप्रधान हे एक संवैधानिक पद आहे आणि त्याची प्रतिष्ठा मोदींनी राखावी. वस्तुस्थिती समजून घेऊनच त्यांनी बोलावे.