पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीत खळबळ; कार्यकर्ते, नेते भावूक, जयंत पाटलांना अश्रू अनावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते भावूक झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले. निवृत्तीचा निर्णय मागे घ्या अशी मागणी त्यांनी केली.

आतापर्यंत महाराष्ट्रात आम्ही सगळे पवाराच्या नावाने मते मागत आलो. पक्षाला त्यांच्यामुळे मते मिळतात. आता तेच बाजुला गेले तर आम्ही कोणाला घेऊन लोकांसमोर जायचे हा आमचा पहिला प्रश्न आहे. अजुनही शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुखपदी राहणे महाराष्ट्रच नाही तर देशातल्या राजकारणासाठी, जनतेसाठी गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या नावानेच ओळखला जातो. असे अचानक बाजुला जाण्याचा अधिकार त्यांना नाही. परस्पर निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार नाही. आम्हाला, देशातील कोणत्याही माणसाला निर्णय मान्य होणार नाही. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, असे जयंत पाटील म्हणाले.

पवारांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजुनही पाहिजे. त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण केले. आजही त्यांच्याकडून स्फुर्ती घेऊन राजकारणात वावरतो. त्यांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याची भाषा केली. आम्हा सगळ्याचे राजीनामा घ्या, तुम्हाला पक्ष कसा नव्या लोकांच्या हातात द्यायचा त्याचा निर्णय घ्या. पण पक्षाच्या प्रमुखपदावर बाजुला जाणे हे पक्षाच्या, राज्यातील, देशातील नव्या पिढीच्या हिताचे नाही. आम्हाला तुमच्या छायेखाली काम करण्याची सवय लागली आहे. तुम्ही बाजुला गेल्यास आम्ही काम करू शकत नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सगळे थांबू. हा पक्ष ज्यांना चालवायचा त्यांना चालवू द्या, असे भरल्या डोळ्यांनी जयंत पाटील म्हणाले.

Breaking News – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार, शरद पवार यांची घोषणा

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभागृहाला मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. याला कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही विरोध केला सभागृहात भावूक वातावरण निर्माण झाले. यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी थेट शरद पवारांचे पाय धरत निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

56 वर्ष सत्तेच्या राजकारकामध्ये माझा सहभाग राहिला. आता मी निवडणुकीला उभा राहणार नाही. आता राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नावर अधिक लक्ष घालण्यावर माझा भर राहणार आहे. याशिवाय मी कोणतीही दुसरी अन्य जबाबदारी घेणार नाही. 1 मे 1960 ते 1 मे 2023 या प्रदीर्घ काळानंतर कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे, असे शरद पवार म्हणाले. अध्यक्षपदावरून निवृत्त होत असलो तरी जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकाळपासून उपलब्ध असेल, असेही ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)