
फर्दापूरच्या गेस्ट हाऊसवर गिरीश महाजन यांची काय भानगड झाली होती. त्यावेळी मी देखील त्या गेस्ट हाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघडय़ा डोळ्यांनी पाहिली आहेत. तेव्हा पेपरमध्ये चवीने छापून येत होते. मी त्यावर काही बोललो नाही. एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असा सूचक इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी महाजन यांना दिला.
भाजप नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा वाद काही नवा नाही. या दोन्ही नेत्यांत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. महाजन यांनी यांनी खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याची चौकशी व्हायला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे व त्यांचे कुटुंबीय व्यथीत झाले आहे. माझ्या मुलाने आत्महत्या केली त्यावेळी मी इथे नव्हतो. मग गिरीश महाजन यांचा रक्षावर संशय आहे का? महाजन यांना सत्तेचा माज व मस्ती आली असून त्यांची ही मस्ती जनताच उतरवेल असे खडसे म्हणाले.
कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशी करा
मी त्यांना अडचणीचा ठरतो म्हणून अशा प्रकारचे उपद्व्याप गिरीश महाजन करत आहेत. तुम्ही नाथाभाऊची चौकशी करून थकलात, त्यामुळे कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून माझ्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा, असे एकनाथ खडसे म्हणाले.
























































