पुढच्या वर्षी फडणवीसांना ‘सरप्राईज’ देणार, जयंत पाटील यांचा सणसणीत टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही कामाला लागलो आहोत. पुढच्या वर्षी महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही सरप्राइज देणार आहोत, असा सनसनाटी टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि मिंधे गटाला लगावला.

मुंबईत आयोजित एका चर्चासत्रात बोलताना जयंत पाटील म्हणाले, अलीकडे अनेक घटक एकत्र येऊन चर्चा करत आहेत. २०२४ मध्ये आजच्याप्रमाणे निराशाजनक चित्र नसेल. लोक आता हुशार झालेत.  आपण मतदान केलेल्या नेत्याने पक्षबदल केल्यावर त्या नेत्यालाच लोक मनातून काढून टाकतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल आणि फडणवीसांसाठी आमच्याकडून सरप्राइज असेल, असे ते म्हणाले.

शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाहीत

शिवसेनेचे एक वैशिष्ट्य आहे. जे लोक त्यांना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाहीत. सध्या महाराष्ट्रात शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे. त्याचा फायदा नक्कीच त्यांना होईल. शिवसेनेच्या मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणू असे मी कधीही म्हणालेलो नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

शिवशक्ती-भीमशक्ती युतीला आमचा विरोध नाही

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करून ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी. मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.