
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. सगळे काही स्वार्थासाठी सुरू असल्याची टीका त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
त्या म्हणाल्या की, ‘‘दरारा, प्रतिष्ठा या गोष्टी कर्तृत्व आणि कामातून होतात. कोणी कोणाच्या घरी गेले याच्यातून होत नाहीत. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी 105 आमदार असणारा नेता जातो याचे काय करणार तुम्ही? कोण कसा विचार करतं हे मला माहिती नाही.’’ महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात जे काही सुरू आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.


























































