लॉकडाऊन जाहीर करताना तीन दिवसांचा अवधी द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नीलम गोऱहे यांची विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर करताना नागरिकांना कमीत कमी तीन दिवसांचा अवधी द्यावा, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे. या अवधीत नागरिक जीवनावश्यक वस्तूंची बेगमी करतील. असंघटित क्षेत्रातील कामगारांना गावी जाण्यास पुरेसा वेळ मिळेल, असे डॉ. गोऱहे यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार राज्यात लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने डॉ. गोऱहे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. गोरगरीब मजूर, निराधार लोकांना महिनाभर पुरेल इतके धान्य रेशनवर उपलब्ध करून देण्यात यावे, असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी दरडोई 3 हजार रुपये जमा करावेत, बांधकामासाठी लागणाऱया साहित्याची ‘वर्क स्पॉट डिलीव्हरी’साठी परवानगी द्यावी, राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असल्यामुळे इतर औषध वापरासंदर्भात तज्ञ डॉक्टर व आयसीएमआरशी सल्लामसलत करून संशोधन कार्य सुरू आहे.

याबाबत ऑनलाइन मोहीम घ्यावी, प्रत्येक जिह्यातील शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन उत्पादन यंत्रणा सुरू करण्यासाठी सीएसआरबरोबरच आमदार निधीचाही वापर करण्यास मुभा द्यावी, अशा विविध मुद्दय़ांकडे डॉ. नीलम गोऱहे यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.