
आजार रोखण्यासाठी पालिकेने निर्देश देऊनही डास निर्माण करणारी ठिकाणे नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणाऱया 3 हजार 659 जणांना पालिकेने नोटीस बजावली आहे. तर 297 घर मालक, सोसायटय़ा आणि गॅरेजविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली.
डासांच्या माध्यमातून पसरणारे आणि साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेकडून मुंबईकरांना घर-आस्थापनांचे परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात येतात. पालिकेकडूनही याबाबत पाहणी आणि कार्यवाही करण्यात येते. पावसाळ्यात मलेरिया डेंग्यू, लेप्टो, कावीळ, स्वाईन फ्ल्यू, गॅस्ट्रो आदी साथीचे आजार पसरण्याचा धोका अधिक असतो.
मलेरिया-डेंग्यूची उत्पत्ती डासांमुळे होते. त्यामुळे डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात येतात. मात्र याकडे काही जणांकडून दुर्लक्ष करण्यात येते. अशा बेजाबदार जणांविरोधात नोटीस आणि न्यायालयीन कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
सहा लाखांचा दंड वसूल
पावसाळ्याआधी आणि वर्षभरात डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी पालिकेकडून धुम्रफवारणीसह भंगार साहित्य उचलणे, पाणी साचणारी ठिकाणे नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येते. तर पाण्याच्या टाकीचे झाकण तुटले असेल तर ते नीट बसवणे, घराजवळ, सोसायटी परिसरात, गॅरेजजवळ खड्डा पडला असून माती टाकून बुजवण्याचे निर्देश देऊनही दुर्लक्ष केल्यास नोटीस बजावण्यात येते. यानुसार न्यायालयाच्या निर्देशानुसार दंड 6 लाख 2 हजार, 2 ते 10 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


























































