
नेपाळची राजधानी काठमांडूमधून पोखरा येथे निघालेले यती एअरलाइन्सचे विमान खराब हवामानामुळे कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 5 हिंदुस्थानींसह 72 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात विमान कंपनीच्या 4 कर्मचाऱयांचाही समावेश आहे.
काठमांडू येथून पोखरा येथे जाण्यासाठी एटीआर 72-500 या दोन इंजिन्स असलेल्या विमानाने उड्डाण घेतले होते. पोखरा विमानतळापासून 20 मिनिटांच्या अंतरावर असताना खराब हवामानामुळे हे विमान एका डोंगरावर जाऊन कोसळले आणि नंतर दरीत कोसळले, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्व जण ठार झाले आहेत. यातील 60 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मदतकार्य अजूनही सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळारून दोघा जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. हे दोघेही स्थानिक मच्छीमार असल्याचे म्हटले जात आहे. ते विमानात नव्हते.
दुर्घटनेमागे नेमके कोणते कारण?
यती एअरलाइन्स ही नेपाळची देशांतर्गत विमानसेवा देणारी दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. कंपनीकडे अशी दोन इंजिन्स असलेली एकूण 6 विमाने आहेत. हे विमान काठमांडूवरून सकाळी 8 वाजता पोखरा विमानतळाजवळ पोहोचत असताना विमानाने हवेतच पेट घेतला आणि नंतर ते डोंगरावर कोसळले. त्यामुळे ही दुर्घटना नेमकी खराब हवामानामुळे घडली, इंजिन्समधील बिघाडामुळे घडली की वैमानिकाच्या चुकीमुळे, याची चौकशी सिव्हिल एव्हिएशन अॅथॉरिटी करणार आहे.
गेल्या वर्षी 22 जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात तारा एअरक्राफ्टचे विमान कोसळून 19 प्रवाशांसह 3 विमान कर्मचाऱयांचा मृत्यू झाला होता. यात 4 हिंदुस्थानींचाही समावेश होता. नेपाळ लष्कराच्या शोध व बचाव पथकाला मुस्तांगच्या सॅनोसव्हेयर भागातील डोंगराळ भागात विमानाचे अवशेष सापडले होते. या अपघाताच्या चौकशीसाठी नेपाळ सरकारने 5 सदस्यीय आयोग स्थापन केला होता. या आयोगाकडे अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिफारशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नेपाळमध्ये विमान अपघातांची मालिका सुरूच आहे.
विमानात 5 हिंदुस्थानी नागरिक होते तर 4 रशियन, दोन दक्षिण कोरियन, 1 ऑस्ट्रेलियन, 1 अर्जेंटियन, 1 फ्रेंच प्रवासी होता.
दोन वेळा मागितली लॅण्डिंगची परवानगी
पोखराची धावपट्टी पूर्व-पश्चिम दिशेने आहे. पायलटने पूर्वेच्या बाजूने लॅण्डिंगची परवानगी मागितली होती. त्याला ती मिळालीही होती, पण थोडय़ाच वेळात त्याने पुन्हा पश्चिम दिशेने लॅण्डिंगची परवानगी मागितली. त्याला ती पुन्हा देण्यात आली, पण लॅण्डिंगपूर्वी 10 सेकंद आधीच हा विमान अपघात झाला.

























































