ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची गरज नवपदवीधर विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी- उपराष्ट्रपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सुविधांची गरज असून आरोग्य क्षेत्रातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी ही गरज पूर्ण करावी आणि ग्रामीण भागात सेवा द्यावी, अशी अपेक्षा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या  नायडू यांनी व्यक्त केली. तसेच आज देशात आरोग्य क्षेत्रात नवनवीन संकल्पनांमुळे आणि चांगल्या उपचार पद्धतीमुळे भारत आरोग्य पर्यटन हब बनला आहे. बाहेरील देशांचे रुग्ण येथे उपचारासाठी येतात. ही आपल्या आरोग्य क्षेत्रातील विकासाची पावती आहे, असे ते म्हणाले.

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान कार्यक्रम उपराष्ट्रपती नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी पदवीप्राप्त स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, कुलपती डॉ. विजय केळकर, प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ. वाय. एम. जयराज आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी उपराष्ट्रपती  नायडू यांच्या हस्ते विद्यापीठात विविध विद्याशाखांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. तसेच डॉ. पनगारिया यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले.

यावेळी नायडू म्हणाले, लोणीसारख्या ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात इतक्या चांगल्या प्रकारे काम सुरु आहे, याचे खरोखर समाधान आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी या कामाचा अधिक विस्तार केला. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विविध क्षेत्रातील दरी मिटवण्यासाठी पुढे आले पाहिजे. महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ असा नारा दिला. मात्र, आज परिस्थिती वेगळी दिसत आहे. ग्रामीण भागातून ओढा शहरांकडे स्थलांतरीत होताना दिसतो आहे. हे चित्र आपल्याला बदलायला हवे, त्यासाठी तरुण पिढीची मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

सेवाभाव हा स्थायीभाव झाला पाहिजे. आपल्या करियरच्या सुरुवातीला आपण तो अंगी बाळगला तर यापेक्षा देशप्रेमाची भावना दुसरी काय असू शकेल, अशी भावना व्यक्त करुन नायडू यांनी आरोग्य आणि ग्रामविकास  क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज व्यक्त केली.