
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) मुंबई कार्यालयाला गुरुवारी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार अशी धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानशी संबंधित एक व्यक्ती मुंबईत हल्ला करेल असा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला आहे.
या धमकीनंतर शहर पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) सतर्क झाले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धमकीचा संदेश पाठवण्यासाठी वापरण्यात आलेल्या ईमेल पत्त्यामध्ये ‘CIA’ होता आणि पाठवणाऱ्याने दावा केला की तालिबानशी संबंध असलेली व्यक्ती शहरात हल्ला करेल.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पाठवणाऱ्याचा आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) पत्ता पाकिस्तानचा आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांना संशय आहे की हा एक खोडसाळपणा असू शकतो, कारण असे ईमेल यापूर्वीही तपास संस्थेला पाठवण्यात आले होते.
तपास यंत्रणांना गेल्या महिन्यात असाच ईमेल प्राप्त झाला होता. पोलिसांनी तपास केला आणि त्यात असे काही सापडले नाही, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.






























































