
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात महावितरणच्या विजेच्या तारांमध्ये घर्षण होवून लागलेल्या आगीत नऊ एकर ऊस जळून खाक झाला. नागरिकांच्या प्रयत्नाने राहते घर व इतर दहा एकर ऊस वाचला. शेतकरी प्रशांत वाबळे यांच्या ऊसाच्या क्षेत्रासह इतर शेतकऱ्यांचा उसही या आगीत खाक झाला.
या प्रकरणी शेतकरी प्रशांत वाबळे यांच्या माहितीवरुन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जळीताची नोंद दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 11.30 वाजता महावितरण कंपनीच्या सुरेगाव शिवारातून गेलेल्या विद्युत तारांचे घर्षण झाले. त्यामुळे लागलेल्या आगीत ऊसाने पेट घेतला. काही वेळात आगीने उग्ररुप धारण केले. त्यामुळे शेतकरी प्रशांत वाबळे यांचा चार एकर, संजय कदम यांचा ठिबकसह तीन एकर ऊस जळून खाक झाला. योगेश कदम, नारायण वाबळे या शेतकऱ्यांच्य उसाचेही आगीत नुकसान झाले. या आगीत एकूण नऊ एकर ऊस जळून खाक झाला.
या आगीच्या घटनेत सुमारे 5.40 लाखांचे नुकसान झाले असून साधारण एक तासाने अग्निशामक बंब घटनास्थळी आला. मात्र तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. आगीच्या घटनेनंतर कर्मवीर काळे साखर कारखान्याच्या शेतकी विभागाचे अधिकारी, महसूल अधिकारी, महावितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
– प्रशांत वाबळे, शेतकरी, सुरेगाव

























































