
श्रीरामपूर तालुक्यातील कडित परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूउपसा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या थर्माकॉलच्या नऊ बोटी ‘महसूल’च्या पथकाने उद्ध्वस्त केल्या. मागील काही महिन्यांपूर्वी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्वतः या भागात बेकायदेशीर चालू असलेल्या वाळूउपसाप्रकरणी कारवाई केली. यात काही ब्रास वाळू जप्त करून त्यांनी सात बोटी उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा या थर्माकॉलच्या बोटींचा वापर करून वाळूतस्करांनी वाळूतस्करी सुरू केली होती.
श्रीरामपूर तालुक्यातील कडित परिसरात प्रवरा नदीपात्रात सध्या पाणी असतानाही थर्माकॉलच्या बोटी म्हणजेच चप्पूचा वापर वाळूतस्कर करीत असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांना मिळाली. पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार मंडलाधिकारी ओहोळ, लिपिक अमोल एडके, तलाठी एन. जी. नाईक, पोलीस पाटील कारभारी वडितके, संतोष पारखे, दीपक बेलकर, चालक तुळशीराम शिंदे या पथकाने थेट कडित येथे जाऊन पाण्यातून वाळू उपसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटी उद्ध्वस्त केल्या.































































