नववी माळ – गोडवा विचारांचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. युगंधरा रणदिवे

नववी माळ मुलींना आवडणारी गोष्ट म्हणजे भोंडला आणि त्यानंतर मिळणारी खिरापत!

खिरापत म्हणजे खारीक, खोबरे, सुकामेवा, साखर अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी एकत्र करायच्या आणि भोंडला संपला की, मुलींना एक-एक जिन्नस ओळखायला लावून मग वाटायची सर्वांना!

आधुनिक जगात त्या खिरापतीची जागा समोसा, वडा, इडली, फरसाण या चटकदार पदार्थांनी घेतली. एकत्र जमणे आणि मजामस्ती करताना थोडी विचारांची देवाणघेवाण हेच तर उद्देश आहेत आपल्या सणांमागचे!
आपण निरीक्षणातून खूप काही शिकतो. ‘दुसऱयास ठेच मागचा शहाणा’ या न्यायाने तर दुसऱयाच्या अनुभवातून चुका कशा टाळायच्या तेही समजतो. जेवढय़ा ओळखी वाढतील तसे आपल्या कामाचे क्षेत्र वाढते. अचानक कोणी मदतीचा हातही देतो. संधी उपलब्ध होतात. जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. समाधान आणि प्रगती या दोन चाकांवर तोल सांभाळत आपण आगेकूच करतच राहायचे.

खिरापतीसारखा गोडवा विचारातून, चर्चेतून, वादविवादातून आपल्या सर्वांना मिळो! नऊ दिवसांच्या प्रवासात अनेक मित्र-मैत्रिणींनी, नातेवाईकांनी माझी मांडलेली मते वाचली, आपली मतेही व्यक्त केली, नवीन मुद्दे सुचवले, तर सरस्वती देवीच्या कृपेने हा भोंडला छान रंगला. खिरापत माझ्या कुवतीप्रमाणे वाटली, ती तुम्ही गोड मानून घेतली. धन्यवाद!