
नवी दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना 20 मार्चला फासावर लटकवण्यात येणार आहे. आता फाशीपासून वाचण्यासाठी दोषींचे अनेकप्रकारे प्रयत्न सुरू आहेत. दोषींपैकी अक्षयने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मंगळवारी पुन्हा एकदा दया याचिका केली आहे. त्याने ही याचिका तुरुंग प्रशासनाकडे दिली असून दिल्ली सरकारकडून ती गृह मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. याआधी या दोषींची फाशी तीनवेळा स्थगित करण्यात आली आहे.
दिल्लीतील एका न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक दोषी मुकेश सिंह याची याचिका मंगळवारी फेटाळली आहे. या प्रकरणाशी आपला संबंध नसून घटना घडली त्यावेळी आपण दिल्लीत नव्हतो. आपल्याला 17 डिसेंबर 2012 रोजी राजस्थानातून अटक करून दिल्लीला आणल्याचा दावा त्याने केला होता. त्यामुळे आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे त्याने याचिकेत म्हटले होते. राजस्थानातून आपल्याला अटक केल्याचे दस्तावेज लपवण्यात आल्याचेही त्याने नमूद केले होते. तसेच तिहार कारागृहात आपले शोषण झाल्याचेही त्याने म्हटले होते. सरकारी वकीलांनी या याचिकेला आक्षेप घेत मुकेश याची याचिका बिनबुडाची असून फाशीला विलंब करण्यासाठी दोषींकडून अशा याचिका करण्यात येत असल्याचे न्यायालयात सांगितले. मुकेशच्या आईने फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी केलेली याचिका मानवाधिकार आयोगानेही फेटाळली आहे. आता या प्रकरणातील दोषी अक्षयने पुन्हा राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे.






















































