गडबड झाली तर ठेकेदाराला बुलडोझरखाली टाकणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा इशारा

पेठ-सांगली या रस्त्याला येत्या पन्नास वर्षांत एकही खड्डा पडणार नाही. कारण, मी ठेकेदाराकडून ‘माल’ खात नाही. देशात एकाही ठेकेदाराकडून एक रुपयाही मी घेतलेला नाही. त्यामुळे कामात काही गडबड झाली तर ठेकेदाराला बुलडोझरखाली टाकण्याचा थेट इशाराच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिला. दरम्यान, इथेनॉल हे भविष्यातील इंधन असून, उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉलनिर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पेठ नाका ते सांगली या 41.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. आष्टा शहरात झालेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील व धैर्यशील माने, आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंग नाईक, आमदार विश्वजित कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आदी उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, इंधन म्हणून इथेनॉलची मागणी वाढत आहे, यासाठी उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉलनिर्मिती झाल्यास त्याचा लाभ साखर कारखान्यांबरोबरच शेतकरी सभासदांना होणार आहे. केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱयांकरिता ‘हार्वेस्टिंग’सारखी योजना आणली आहे. या योजनेमुळे कमी वेळेत ऊस कारखान्यास जाईल आणि उसाचा उतारा चांगला मिळेल. इथेनॉलबरोबरच हायड्रोजन हेदेखील भविष्यातील इंधन असून, या इंधनाच्या निर्मितीसाठीही शेतकऱयांनी पुढे येणे गरजेचे आहे. हायड्रोजन इंधननिर्मितीतून शेतकऱयाला ऊर्जादाता बनवले पाहिजे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र हायड्रोजननिर्मितीचे हब होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गडकरी म्हणाले, पेठ-सांगली या रस्त्याचे काम एका महिनाभरात सुरू होणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून या रस्त्याची बांधणी करण्यात येणार असल्याने हा रस्ता अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होईल व या भागातील विकास झपाटय़ाने होईल. या रस्त्यावरून होणारा प्रवास आनंददायी होण्यासाठी या भागातील शैक्षणिक संस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून हा रस्ता ग्रीन हायवे करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आळंदी-पंढरपूर महामार्ग तीन महिन्यांत पूर्ण होईल

आळंदी-पंढरपूर महामार्ग हा येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल. फलटण शहरामधून जाणारा पालखी मार्ग लवकरच पूर्ण होईल. यासोबतच फलटण-दहिवडी-सांगली हा मार्ग मंजूर करण्यात येणार असून, येत्या सहा महिन्यांत या मार्गाचे काम सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. उंडवडी-कडेपठार-बारामती-फलटण रस्ता चौपदरीकरण व काँक्रिटीकरण, शिंदेवाडी-भोर-वरंधा घाटरस्त्याचे भूमिपूजन व लोणंद-सातारा रस्त्याच्या लोकार्पणाच्या फलटणमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संत तुकाराम गाथा व ज्ञानेश्वरीची डिजिटल प्रत तयार करण्यात येणार आहे. पालखीमार्ग करताना दोन टाइल्सच्यामध्ये गवत लावा, त्यामुळे वारकऱयांना त्रास होणार नाही. मुंबई ते बंगळुरू व नागपूर ते बंगळुरू हे महामार्ग फलटणमधून जात आहेत. फलटणला असणाऱया विमानतळावरील मार्गाचे कामसुद्धा करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.