मला चांगले राहायला आवडते, कोणतेही नियमबाह्य काम नाही! नितीन राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मला चांगले राहायला आवडते. त्यामुळे पर्णकुटी बंगल्याचे जे काम सुरू आहे ते सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहूनच करीत आहे. लोकांना वाटतं मी ऊर्जा खात्यात काम करतो, त्यामुळे त्यांना ते सलत आहे. त्यांच्या पोटात जळत आहे, अशा शब्दांत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिले आहे.

शेतकऱयांची वीज तोडता मग मंत्र्यांच्या बंगल्यावर कोटय़वधींचा खर्च कशासाठी करता, असा प्रश्न उपस्थित करत भाजपने राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका केली होती. याला आज ऊर्जामंत्र्यांनी उत्तर दिले. माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्या वेळीही मी खर्च करू शकत असल्याने असाच राहायचो. मला चांगलं राहायला आवडतं. लोकांना जे समजायचं ते समजावं. माझं किचन बघा, हे लॅविश आहे का? माणसाने लॅविश राहू नये का? लोकांना वाटतं मी ऊर्जा खात्यात काम करतो, त्यामुळे त्यांना माझा तिरस्कार वाटतो, असे नितीन राऊत म्हणाले.

भाजपच्या नेत्यांनी घरात काय खर्च केला ते बाहेर आलं तर?

पर्णकुटी बंगला अजूनही वाईट अवस्थेत आहे, त्याचे काम सुरू आहे. गेले एक वर्ष झाले तरी शासकीय निवासस्थान मिळालं नाही. कोरोना काळात शासकीय निवासस्थान मिळालं नसल्यानं भाडय़ाच्या घरात राहिलो. तेव्हा म्हटलं एक किंवा दोन रूम तरी तयार करून द्या. आता घर मिळालं असलं तरी त्यामध्ये अजून काम सुरू आहे.

फोटोत दिसत असलेला टीव्ही मी माझ्या खर्चाने आणला आहे. माझ्या आधीच्या घरी मोठा टीव्ही होता. तुम्ही इतर मंत्र्यांचे बंगले पाहिले तर तेदेखील तसेच आहेत. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या घरात काय खर्च केला हे त्यांनी पाहावं. हे जर बाहेर आलं तर वाद होईल, असा इशारा देतानाच मला कोणतेही आरोप करायचे नाहीत. मी जे काही केलं ते नियमानुसार केलं, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.