नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बिहारच्या राजकीय घडामोडीवर देशाचं लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीने भाजपविरोधात दंड थोपटले असून आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे.

‘इंडिया’ आघाडीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारमध्ये परतले असून 29 डिसेंबर रोजी त्यांनी जदयूची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती ‘इंडिया टूडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

जदयूची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक 29 डिसेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. या बैठकीमध्ये राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांना जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यानंतर पक्षातील गोंधळ टाळण्यासाठी हे पद नितीश कुमार स्वत: स्वीकारू शकतात किंवा आपल्या मर्जीतील नेत्याकडे सोपवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ललन सिंह यांच्या कार्यपद्धतीवर नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा आहे. लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याची त्यांची सलगी वाढत आहे. त्यामुळे पक्षातील फूट टाळण्यासाठी नितीश कुमार स्वत: अध्यक्षपद स्वीकारतील किंवा निकटवर्तीयाच्या गळ्यात ही माळ घालतील, अशी शक्यता आहे.

ललन सिंह हे 2024 ची लोकसभा निवडणुक पुन्हा एकदा मुंगेर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. येथील ते विद्यमान खासदार असून आता ते राजदच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकता, अशी शक्यता आहे.