बुमरा अन्य आंतरराष्ट्रीय गोलंदाजांपेक्षा कित्येक पटीने पुढे आहे. त्याच्यासारखा हिरा संघात असणे हे हिंदुस्थानी संघाचे भाग्यच आहे, असे कौतुकास्पद उद्गार हिंदुस्थानचा माजी फलंदाज संजय मांजरेकरने काढलेत.
अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आग ओकतोय. बुमराच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाज अक्षरशः गुडघे टेकत असून फलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरतेय. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कमी धावसंख्या असतानाही बुमराच्या प्रभावी माऱ्यामुळे हिंदुस्थानने थरारक विजय मिळवला होता. काल अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराने 4 षटकांत केवळ 7 धावा देत 3 विकेट घेत अफगाणी फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.