एलएसीमध्ये कोणताही फेरबदल मान्य करणार नाही! चीफ ऑफ आर्मी स्टाफ रावत यांनी चीनला ठणकावले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखमध्ये वारंवार घुसखोरी करून चीन आमच्यावर दबाव आणत असेल तर आम्हीही पुढच्या परिणामांना तोंड द्यायला सज्ज आहोत. हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील सीमा निश्चित करणाऱया वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी ) केलेला कोणताही फेरबदल हिंदुस्थान कदापिही सहन करणार नाही, असा सज्जड ईशारा चिफ ऑफ आर्मी स्टाफ बिपीन रावत यांनी विस्तारवादी चीनला दिला आहे.

एलएसीवर सतत असणारा वाढता तणाव पाहता चीनसोबत संघर्ष वाढण्याची शक्यताही रावत यांनी व्यक्त केली.लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी हिंदुस्थान आणि चीनच्या लष्करी कमांडर्स बैठकीची आठवी फेरी सुरु असताना रावत यांनी दिलेला ईशारा महत्वपूर्ण मानला जात आहे.

 एका व्हर्चुअल चर्चासत्रात बोलताना सीडीएस बिपीन रावत यांनी एलएसीची स्थिती कोणत्याही स्थितीत बदलू न देण्याच्या हिंदुस्थानी धोरणाचा पुनरुच्चार केला.

ते म्हणाले वास्तविक नियंत्रण रेषेवर सतत तणाव निर्माण करण्यासाठी चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी लडाखमध्ये सतत पुरापती करीत आहे. त्यामुळेच एलएसीवर सतत युद्धजन्य वातावरण दिसत आहे. चिनी लष्कराच्या कोणत्याही आगळिकीला तोंड द्यायला हिंदुस्थानी जवान सज्ज आहेत. आमचे जवान चिनी कुरापतींना समर्थपणे प्रत्युत्तर देत आहेत.

वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) कोणताही फेरबदल आम्ही होऊ देणार नाही. त्यासाठी भले चिनी लष्कराशी दोन हात करावे लागले तरी बेहत्तर अशी भूमिका रावत यांनी या चर्चासत्रात मांडली आहे.

पाकिस्तान सतत सीमेवरून दहशतवाद्यांना घुसखोरी करायला लावून हिंदुस्थानवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतोय. पण पाकिस्तानचे नापाक इरादे हिंदुस्थानी लष्कर कदापिही यशस्वी होऊ देणार नाही. कुरापतखोर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्हाला एलओसीवर मोठे पाऊल उचलावे लागेल असा खरमरीत संदेशही सीडीएस रावत यांनी पाकिस्तानला दिला.