ठाण्यात दहा दिवस अवजड वाहनांना नो एण्ट्री; उत्सवकाळात ट्रॅफिककोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलीस इन अॅक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुका आणि भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी तसेच अनुचित घटना टाळण्यासाठी ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी याबाबत अधिसूचना काढली असून येत्या १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये दीड दिवस, पाच दिवस आणि अनंतचतुर्दशीला ट्रॅफिककोंडी टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार असून पोलिसांनी अॅक्शन प्लॅन बनवला आहे.

येत्या सोमवारपासून गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्यानंतर दीड, पाच, गौरी-गणपती, सात दिवसांचे गणपती तसेच अनंत चतुर्दशीच्या विसर्जना वेळी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार आहेत. या काळात रस्त्यांवर मोठा जनसमुदाय असणार असल्याने जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ठाणे शहर वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रातील मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

असा असेल वाहतुकीत बदल
यंदा दीड दिवसांचे गणपती विसर्जन १५ सप्टेंबर, पाच दिवसांचे गणपती १८ सप्टेंबर, गौरी-गणपती विसर्जन १९ सप्टेंबर आणि सात दिवसांचे गणपती विसर्जन २० सप्टेंबर या दिवशी आहे. त्यामुळे मध्यरात्री १२ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत सर्व जड-अवजड वाहनांना ठाण्यात प्रवेश बंद राहणार आहे. तसेच २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री १२ वाजल्यापासून २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत अवजड वाहनांवर निर्बंध लागू राहतील.

इतर दिवशी रात्री १२ ते सकाळी ६ मुभा
शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग आणि एका राज्य महामार्गाची वाहतूक सुरू असते. बाहेरील राज्यांतून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांचीही मोठी संख्या असल्याने गणेशोत्सव काळात वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, इतर दिवशी रात्री १२ ते सकाळी ६ अवजड वाहनांना वाहतुकीस मुभा असणार, अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.