‘फ्लॉप शो’ करणाऱ्या टीम इंडियाची आयसीसीने काढली लाज, टी-20 संघात एकही खेळाडू नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाने रविवारी यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज आपल्या सर्वोत्तम आयसीसी जागतिक टी-20 संघाची निवड केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत ‘फ्लॉप शो’ करणाऱ्या टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला अथवा गोलंदाजाला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. या घोषणेने आयसीसीने माजी विश्वविजेत्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाची लाजच काढल्याचे बोलले जात आहे. जागतिक टी-20 संघाचे नेतृत्व पाकिस्तानच्या बाबर आझमकडे सोपवून आयसीसीच्या ज्युरींनी हिंदुस्थानी संघाच्या जखमेवर मीठच चोळले आहे.

2007ची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या टीम इंडियाला यंदा उपांत्य फेरीतही प्रवेश करता आलेला नाही. प्रथम पाकिस्तानविरुद्ध आणि नंतर न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव पत्करणाऱ्या हिंदुस्थानी संघाला या स्पर्धेत आपला नैसर्गिक खेळ दाखवताच आला नाही. नंतरचे छोटय़ा संघांविरुद्धचे सामने टीम इंडियाने जिंकले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. सलग दोन पराभवांनी हिंदुस्थानी संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या स्थितीत आला होता. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला पराभूत केले आणि टीम इंडियाच्या स्पर्धेतून गच्छंतीवर शिक्कामोर्तब झाले होते. या अपयशामुळे हिंदुस्थानी संघाला आयसीसीकडून लाजिरवाणी वागणूक मिळाली.

पैशांसाठी आयपीएल खेळून दमलेल्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंसाठी आयसीसी जागतिक संघात स्थान न मिळणे ही मोठी लाजिरवाणी गोष्ट ठरली आहे. आयसीसीच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि जोस बटलर यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंची कामगिरी संपूर्ण टी-20 स्पर्धेत उत्पृष्ट झाली.

दक्षिण आफ्रिका, श्रीलंकेच्या खेळाडूंना मात्र संधी

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप प्लेइंग इलेव्हनमध्ये डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर, बाबर आझम, चारिथ अस्लंका, एडन मार्पराम, मोईन अली, वानिंदू हसरंगा, अॅडम झम्पा, जोस हेझलवूड, ट्रेंट बोल्ट, अॅनरिक नॉर्टजे, शाहीन आफ्रिदी (12वा) या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. उपांत्य फेरीस पात्र न ठरू शकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंना मात्र या संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र ज्युरींनी बाद फेरी न गाठणाऱ्या श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना संघात निवडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधील बक्षिसे

जगज्जेता ऑस्ट्रेलिया ः 12 कोटी रुपये.

उपविजेता न्यूझीलंड ः 6 कोटी रुपये.

पाकिस्तान (उपांत्य फेरी) ः 3 कोटी रुपये.

इंग्लंड (उपांत्य फेरी) ः 3 कोटी रुपये.

सुपर-12 फेरीतील संघ ः 52 लाख रुपये.