
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईच्या सर्व उपनगरीय लोकल पंधरा डब्यांच्या हव्यात, असे आदेश रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी नुकतेच मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले आहेत. नजीकच्या काळात विरार ते अगदी खोपोली ते कसारापर्यंत पंधरा डब्यांची लोकल चालविणे शक्य आहे. परंतु जागेअभावी दक्षिण मुंबईतील अनेक स्थानकांवर पंधरा डब्याला थांबा देणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट असल्याचे अधिकाऱयांचेच म्हणणे आहे.
रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी नुकतेच सर्व लोकल पंधरा डब्यांच्या करण्याविषयीचा आपला अभ्यास अहवाल दोन आठवडय़ांत सादर करण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱयांना दिले आहेत. परंतु मुंबईसारख्या जमिनीची कमतरता असलेल्या ठिकाणी सर्व गाडय़ांना पंधरा डब्याच्या करणे कठीण असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे. सध्याच्या बारा डब्याच्या लोकल पंधरा डब्याच्या केल्यास त्यांची प्रवासी क्षमता 25 टक्के वाढणार आहे.
पंधरा डब्यांच्या लोकलची लांबी जास्त असल्याने त्यांना पार्क करण्यासाठी कारशेडमध्येदेखील मोठी जागा लागते. तसेच दोन स्थानकांतील अंतर कमी असल्यासही गोंधळ होतो. त्यासाठी मेट्रोच्या धर्तीवरील कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल अर्थात ‘सीबीटीसी’ सिग्नल यंत्रणा हवी असून अत्याधुनिक ‘सीबीटीसी’ प्रकल्पाचा समावेश एमयूटीपी 3 (अ)मध्ये करण्यात आला आहे.
डब्यांची संख्या – प्रवाशी क्षमता
12 डबा लोकल – 2,400
15 डबा लोकल – 3,000
सध्या पंधरा डबा कुठे धावते…
ऑक्टोबर 2012पासून मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावर पंधरा डबा धावते. तर सेमी फास्ट सेवा ठाण्याहून कल्याणला जाताना कळवा, मुंब्रा, दिवा आणि कोपर अशा जलद लोकल न थांबणाऱया स्थानकांवर थांबते. चर्चगेट ते विरार दरम्यान जलद मार्गावर ‘प.रे.’ची पंधरा डबा थांबते.
विभाग-एकूण फेऱया-पंधरा डबा- फेऱया
पश्चिम रेल्वे-1365-5-54
मध्य रेल्वे-1772-1-16
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अडचणीत
मध्य रेल्वेच्या पंधरा डबा लोकलला सीएसएमटी स्थानकात उभी करण्यासाठी सध्या केवळ 7 नंबरचा एकच फलाट उपलब्ध आहे. तसेच चर्चगेट स्थानकातही पंधरा डब्यांचा 4 नंबरचा एकच फलाट आहे. येथेही फलाटांची लांबी वाढविण्यासाठी जागा उपलब्ध नसून चर्चगेट ते मुंबई सेंट्रल फलाट वाढविण्यासाठी जागा नाही. तसेच माटुंगा रोड, माहीम, खार, वांद्रे येथेही अडचणी येतात.
अंधेरी ते विरार स्लो मार्गावर पंधरा डबा
मध्य रेल्वेवर कल्याण ते खोपोली आणि कल्याण ते कसारा या मार्गावर पंधरा डब्यांच्या गाडय़ांसाठी 460 कोटींचा प्रकल्प विचाराधीन आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार स्लो कॉरिडॉरमध्ये पंधरा डब्यांची लोकल चालविण्यासाठी 70 कोटींची योजना आखली आहे. त्यासाठी ‘प.रे.’च्या 14 स्थानकांच्या एकूण 31 फलाटांची लांबी वाढवावी लागणार आहे.


























































