नगर जिल्ह्यातील एटीएम केंद्राची सुरक्षा रामभरोसे, पोलीस अधीक्षकांनी सूचना देऊनही बँका बेफिकीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरासह जिल्ह्यातील अनेक एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या एटीएम सेंटरची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधीक्षकांनी काही दिवसांपूर्वी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एटीएमच्या सुरक्षेसंदर्भात सूचना केली होती. मात्र, त्यानंतरही बँकांकडून कार्यवाही होताना दिसत नाही.

जिह्यात काही महिन्यांपूर्वी चोरटय़ांनी एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबतची दखल घेत पोलीस अधीक्षक पाटील यांनी बँक अधिकाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या होत्या. मात्र, सध्या शहरासह जिल्ह्यातील अनेक एटीएम सेंटरची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यांवर असल्याचे दिसत आहे. अनेक एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक दिसत नाहीत. परंतु, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या भरवशावर लाखोंची रोकड एटीएममध्ये आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या मर्यादा यापूर्वी उघड झालेल्या आहेत. अनेकदा चोरटय़ांकडून कॅमेरा तोडण्याचे अथवा त्यावर स्प्रे मारण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच, एटीएम मशीन गॅस गटरने तोडून एटीएम मशीनच पळविण्याचा प्रयत्न झालेला आहे. इतकी मोठी रोकड ठेवताना सीसीटीव्ही मर्यादा समोर आल्या आहेत. तरीही निष्काळजीपणा वाढला आहे.

बँकांच्या निष्काळजीपणामुळे पोलिसांचे काम वाढले

रात्रीच्या वेळेस पोलिसांकडून आपल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गस्त घातली जाते. पहाटेपर्यंत ही गस्त सुरू असते. आता नियमित गस्त सुरू असताना पोलिसांना एटीएम सेंटरबाहेरही गस्त घालावी लागत आहे. बँकांच्या निष्काळजीपणामुळे पोलिसांचे काम वाढल्याचे दिसत आहे.

अनेक बँकांना पार्किंगच नाही

शहरासह जिह्यात असलेल्या अनेक बँकांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे बँकेत आलेल्या ग्राहकांकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. या वाहनांमुळे वाहतूककोंडी होत असून, या वाहतूककोंडीचा त्रास वाहनचालक व सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. बँक प्रशासनाचे याकडेही दुर्लक्ष झाले आहे.