लोणी परिसरात दुसऱया दिवशीही बिबटय़ा जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर नगर जिह्यात उदंड बिबटे झालेत. त्यांना जेरबंद करण्याचे आव्हान वनखात्यापुढे आहे. काल रविवारी मध्यरात्री लोणी पीव्हीपी कॉलेजलगत सहावा बिबटय़ा पिंजऱयात अडकवण्यात वनखात्यास यश आले आहे.

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील बाळासाहेब ब्राम्हणे यांच्या मक्याच्या शेतात साधारण दीड वर्षे वयाचा बिबटय़ा जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. या घटनेची माहिती मिळताच प्राणिमित्र विकास म्हस्के, वनरक्षक प्रतीक गजेवार घटनास्थळी पोहोचले. कोपरगावच्या वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे-पाटील यांना याबाबत माहिती देण्यात आली. रविवारी मध्यरात्री एक बिबटय़ा जेरबंद झाल्यानंतर त्याच मकाच्या शेतात दुसरा बिबटय़ा आढळला. एकाच ठिकाणी दुसरा बिबटय़ा जेरबंद झाल्याने परिसरात आणखी किती बिबटय़ांचा अधिवास आहे याचा आकडा सांगणे कठीण बनले असून, या परिसरातील नागरिक बिबटय़ाच्या दहशतीखाली आहेत.

डॉ. सुनील आहेर, अजय बोधक, अनिल जाधव, अमोल ब्राम्हणे, नानासाहेब ब्राम्हणे, सुधीर ब्राम्हणे, दशरथ सोनवणे, मंडू खेमणार यांनी वनखात्यास मदत केली. लोणी, बाभळेश्वर, कोल्हार-भगवतीपूर परिसरात बिबटय़ाने उच्छाद मांडला आहे. रोजच शेतकऱयांच्या पशुधनावर हल्ले करून बिबटय़ा त्यांना फस्त करीत आहे. वनखाते बिबटय़ांना जेरबंद करण्यासाठी कंबर कसून काम करीत आहे.